अडते व मापाऱ्यांच्या बंदने २५ कोटींची उलाढाल ठप्प
By Admin | Updated: December 22, 2014 22:55 IST2014-12-22T22:55:45+5:302014-12-22T22:55:45+5:30
शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येत असलेली अडत रद्द करण्यात यावी आणि मापाऱ्यांचे मापार दर रद्द करावे, असा आदेश पणन संचालकांनी काढला. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले.

अडते व मापाऱ्यांच्या बंदने २५ कोटींची उलाढाल ठप्प
यवतमाळ : शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येत असलेली अडत रद्द करण्यात यावी आणि मापाऱ्यांचे मापार दर रद्द करावे, असा आदेश पणन संचालकांनी काढला. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. या विरोधात आवाज उठवत अडते आणि मापाऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला. यामुळे जिल्ह्याची उलाढाल ठप्प झाली. बंदचा फटका शेतकऱ्यांनाही बसला.
कृषीचे उत्पादन पूर्णत: निसर्गावर विसंबून आहे. कृषी उत्पादकाला उत्पादन खर्चावर आधारित मूल्य मिळत नाही. यामुळे कृषिमाल उत्पादकाचे खच्चीकरण होत असल्याचा निर्वाळा देत पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी शेतकऱ्यांकडून घेण्यात येणारी अडत रद्द करून ती खरेदीदारांकडून वसूल करावी, असे आदेश काढले होते. यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत दिलासा मिळणार होता.
पणन संचालकांनी घेतलेल्या निर्णयावर अडते आणि मापाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेत निर्णयाला विरोध दर्शविला. त्यामुळे सोमवारी दिवसभर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. परिणामी कामकाज दिवसभर थांबले होते. यामुळे जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनची २५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.
जिल्ह्यातील दोन हजार अडते आणि मापाऱ्यांनी काम बंद ठेवले होते. यामुळे हमालांच्या हातालाही काम मिळाले नाही. दरम्यान, सहकार मंत्र्यांच्या आश्वासनानंतर दुपारी निर्णय स्थगित करण्यात आला. मंगळवारपासून जिल्ह्यातील
बाजार समित्या पूर्ववत होऊन खरेदी-विक्रीचे व्यवहार पुन्हा सुरू होणार आहे.
व्यापारी व अडत्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी राजेश खेवले यांना सादर करण्यात आले. चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू, सचिव राजेश निमोदिया, अडते संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पवार, उपाध्यक्ष मोहंमद खालीद, मनिष जिरापूरे, विजय मुंधडा, निकेश लोढाया यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते. दरम्यान, अडत संदर्भात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्यापाऱ्यांचा बंद असल्याची माहिती शेतकऱ्यांना नव्हती. त्यामुळे काही जण आपला माल विक्रीसाठी घेऊन आले होते. त्यांची गैरसोय झाली. (शहर वार्ताहर)