१४ रस्त्यांसाठी २४४ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 21:42 IST2017-08-12T21:31:37+5:302017-08-12T21:42:34+5:30
केंद्र शासनाने यवतमाळ जिल्ह्यातील १४ प्रमुख रस्त्यांसाठी २४४ कोटी ४७ लाख रुपये मंजूर केले आहे.

१४ रस्त्यांसाठी २४४ कोटी
केंद्रीय रस्ते निधी : बहुतांश रस्त्यांची कामे प्रगतिपथावर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र शासनाने यवतमाळ जिल्ह्यातील १४ प्रमुख रस्त्यांसाठी २४४ कोटी ४७ लाख रुपये मंजूर केले आहे. यातून रस्त्यांची कामे सुरू आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासासाठी शेकडो कोटींच्या कामांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविले होते. त्यापैकी अलिकडेच केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) १४ रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. त्यासाठी २४४ कोटी ४७ लाख रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले. त्यात राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांचा समावेश आहे. यवतमाळ-धामणगाव या मार्गावर ५० कोटी रुपये खर्च केले जात आहे. यातून पोस्ट आॅफिस चौक ते करळगावपर्यंतच्या चौपदरी रस्त्याचे बांधकाम होत आहे. या मार्गात अनेक पुलांचाही समावेश आहे. याशिवाय रस्त्याच्या बाजूला बेंबळा प्रकल्पाच्या जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गावरील सुमारे दोन किलोमीटरचा घाट सरळ केला जाणार आहे. यवतमाळ-अकोलाबाजार मार्गासाठी ५० कोटी, कोळंबी-घाटंजी २० कोटी, बाभूळगाव-नेर आठ कोटी, दाभा-कुºहेगाव दोन कोटी, पुसद-गुंज-महागाव सुमारे दहा कोटी, वाशिम-पुसद-गुंज नऊ कोटी ९० लाख अशा आणखी काही मार्गांचा समावेश आहे. यवतमाळ, पुसद व पांढरकवडा या तीनही विभागात केंद्रीय रस्ते निधीमधून ही कामे केली जात आहेत. यातील बहुतांश कामे प्रगतिपथावर आहे. मात्र काही कामांच्या गुणवत्तेबाबत बांधकाम खात्यानेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
१०० वृक्षांचा प्रस्ताव मंत्रालयात
धामणगाव मार्गावरील बहुतांश हिरवीकंच झाडे मशीनद्वारे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे हा मार्ग बोडखा झाला आहे. उन्हात किंवा पावसाळ्यात या मार्गावर झाडांचा कोणताही आश्रय उरलेला नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती चौकापासून डाक कार्यालयापर्यंत असलेली १०० वृक्षे यंत्राच्या सहाय्याने उचलून जाम रोडवर पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव अमरावतीच्या मुख्य अभियंत्यांमार्फत शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.