१३२ जागांसाठी २४ हजार उमेदवार
By Admin | Updated: October 27, 2014 22:43 IST2014-10-27T22:43:56+5:302014-10-27T22:43:56+5:30
जिल्हा परिषदेच्या जम्बो पदभरतीला २ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असून या परीक्षेसाठी दिवाळी संपताच कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. १३२ जागांसाठी तब्बल २४ हजार ५५२ उमेदवार परीक्षा देणार आहे.

१३२ जागांसाठी २४ हजार उमेदवार
जिल्हा परिषदेची जम्बो पदभरती : सुटीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांची धावपळ
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या जम्बो पदभरतीला २ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असून या परीक्षेसाठी दिवाळी संपताच कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. १३२ जागांसाठी तब्बल २४ हजार ५५२ उमेदवार परीक्षा देणार आहे. सध्या शाळांना सुट्या असल्याने परीक्षा केंद्रांसाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा अडचणीत सापडली आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेने जम्बो पदभरती प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. यासाठी २, ८, ९, १६ आणि २२ नोव्हेंबरला परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी त्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. या परीक्षेसाठी शासकीय आणि खासगी शाळा घेण्यात येणार आहे. मात्र दिवाळीच्या सुट्यांमुळे शाळा मिळण्यास अडचणी येत आहे. २ नोव्हेंबरला कृषी विस्तार अधिकाऱ्यांच्या दोन पदाची परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी २४४ उमेदवार आहेत. कनिष्ठ अभियंता पदासाठी १८१ उमेदवार परीक्षा देणार असून प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या एका जागेसाठी ६४ उमेदवार परीक्षा देणार आहे. तारतंत्रीच्या एका जागेसाठी १०३ उमेदवार राहणार आहे.
८ नोव्हेंबरला वरिष्ठ सहाय्यक लेखा या चार जागांसाठी ३९७ उमेदवार, औषध निर्माण अधिकारीच्या एका पदासाठी १८२ उमेदवार, हंगामी आरोग्य सेवक पुरूष सेवक फवारणी पदासाठी ५२९ उमेदवार परीक्षा देणार आहेत. ९ नोव्हेंबरला कंत्राटी ग्रामसेवकाच्या १३ पदांसाठी १०३९ उमेदवार परीक्षा देणार आहेत. स्थापत्य अभियंत्रा सहाय्यकाच्या ४० पदासाठी १२९९ उमेदवार परीक्षेला बसणार आहे. १६ नोव्हेंबरला कनिष्ठ साहाय्यक लेखाच्या तीन पदांसाठी ५७९ उमेदवार, २२ नोव्हेंबरला विस्तार अधिकारी सांखिकी पदासाठी १२७३ उमेदवार आणि लघुलेखकाच्या एका जागेसाठी ५१ उमेदवार, कनिष्ठ लेखाधिकाऱ्याच्या तीन जागेसाठी ३०३ आणि परिचराच्या ४५ जागांसाठी १८ हजार १५३ उमेदवार परीक्षेला बसणार आहे.(शहर वार्ताहर)