2100 चालक-वाहकांचा रोज सव्वा लाख प्रवाशांशी संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST2021-02-24T05:00:00+5:302021-02-24T05:00:07+5:30
जिल्ह्यामध्ये लाॅकडाऊननंतरच्या काळात दरदिवसाला दीड लाख प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस नव्याने संचारबंदी लागू झाल्यावर एक लाख दहा हजार प्रवासी ने-आण करण्याचे काम नित्याने करीत आहे. या प्रवाशांच्या संपर्कात येणारे वाहक आणि चालक कोरोना काळात सर्वाधिक अफेक्टेड होऊ शकतात. यामुळे कोरोनासारख्या भयंकर आजारापासून या कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे.

2100 चालक-वाहकांचा रोज सव्वा लाख प्रवाशांशी संपर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, असे ब्रीद वाक्य घेऊन चालणारी एसटी कोरोनानंतरच्या काळातही प्रवाशांना अविरत सेवा देत आली आहे. या सेवेकरिता झटणारे कर्मचारी मात्र, अजूनही महामारीत असुरक्षित आहेत. त्यांना लस उपलब्ध करून सुरक्षित करावे, अशी मागणी वाहक आणि चालकांकडून जाेर धरत आहे.
जिल्ह्यामध्ये लाॅकडाऊननंतरच्या काळात दरदिवसाला दीड लाख प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस नव्याने संचारबंदी लागू झाल्यावर एक लाख दहा हजार प्रवासी ने-आण करण्याचे काम नित्याने करीत आहे. या प्रवाशांच्या संपर्कात येणारे वाहक आणि चालक कोरोना काळात सर्वाधिक अफेक्टेड होऊ शकतात. यामुळे कोरोनासारख्या भयंकर आजारापासून या कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. असे केले तरच वाहक आणि चालक सुरक्षित होतील. त्यांच्याकडून इतरांना धोकाही होणार नाही किंवा इतरांकडून त्यांनाही कोरोनाची लागण होणार नाही. यामुळे गावखेड्यातून शहरात प्रवासी घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुरक्षित होईल.
यासाठी आरोग्य विभागाने एसटी कर्मचाऱ्यांचे महत्त्व लक्षात घेत प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून रेटली जात आहे. अद्यापही लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून कुठलाही होकार आला नाही. जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची संख्या मात्र मागविण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. एसटीने प्रवास करताना अनेक प्रवासी खासगी वाहनांचा विचार करताना पाहायला मिळतात. याचे मूळ कारण कोरोनाबाबत उपाययोजना नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत आहे. याकरिता वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
११०००० प्रवाशांचा रोज प्रवास
गावापासून शहरापर्यंत प्रवाशांना ने-आण करण्याचे काम एसटी करते. दर दिवसाला राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमधून एक लाख दहा हजार प्रवासी प्रवास करतात. वाहक आणि चालक या प्रवाशांच्या दररोज संपर्कात असतात. यामुळे या कर्मचाऱ्यांवर कोरोनाचे सावट अधिक गडद झाले आहे. त्यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरणाची गरज आहे.
तपासणीच नाही
कोरोना याेद्धा म्हणून डाॅक्टर, पोलीस, महसूल कर्मचारी, आशा यांना प्रथम तपासणी करून लसीकरण करण्यात आले. मात्र, सर्वाधिक जनसंपर्क असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना तपासल्याच गेले नाही. त्यांना लसीकरणासाठी लसही अद्यापपर्यंत उपलब्ध झाली नाही.
विभागीय कार्यालयाकडून जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा अहवाल मागविण्यात आला आहे. त्यांना औषधोपचार करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये लसीकरणासाठी विभागाकडे मागणी नोंदविण्यात येणार आहे. यामुळे लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक
एसटीच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी सीएसकडे कोरोना लसीची मागणी करण्यात आली आहे. तसा प्रस्तावही आज जिल्हा प्रशासनाकडे, आरोग्य यंत्रणेकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच यासंदर्भात उपाययोजना होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचारी सुरक्षित होतील.
- संदीप मडावी, कामगार अधिकारी
कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी संघटनेने विभागीय कार्यालयाकडे लसीकरणाची मागणी केली आहे. कर्मचारी अत्यावश्यक सेवा देणारे घटक आहेत. वेगवेगळ्या प्रवाशांशी त्यांचा संपर्क येतो. यामुळे त्यांना सुरक्षित करण्यासाठी कोरोनाची लस महत्त्वाची आहे.
- गणेश गावंडे, अध्यक्ष, कामगार सेना