21 lakh burglaries in eight days in the district | जिल्ह्यात आठ दिवसांत २१ लाखांच्या घरफोड्या
जिल्ह्यात आठ दिवसांत २१ लाखांच्या घरफोड्या

ठळक मुद्देपुसदमध्ये गोळीबार : सरत्या वर्षात चोरट्यांचे आव्हान, कालचे बालगुन्हेगार बनले सराईत

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घराला कुलूप लावायचे की नाही अशी स्थिती संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाली आहे. काही तासांसाठीसुद्धा संपूर्ण कुटुंबासह घराबाहेर पडणे धोकादायक ठरत आहे. पुसदमध्ये तर दोन चोरट्यांनी अंदाधुंद गोळीबार करीत घरामालकाला जखमी केले. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या आठ दिवसाच्या कालावधीत विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये तब्बल २१ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. पोलिसांना मात्र एकही आरोपी गवसलेला नाही.
चोरी करताना संशयित दिसला तरी त्याला हटकण्याची रोखण्याची सोय राहिली नाही. पुसदमधील शिवाजी पार्कमध्ये हेमंत मेश्राम यांच्या घरी चोरटे घुसले.बाहेरगाववरुन आलेल्या मेश्राम कुटुंबीयांना घरात चोर असल्याचा संशय येताच त्यांनी आरडाओरडा केला. संपूर्ण परिसर जागा झाला. शेजारी-पाजारीही मदतीला धावले. मात्र चोरट्यांनी अंदाधूंद गोळीबार सुरू केला. यामुळे जीवाच्या भीतीने या चोरांना जाण्यासाठी वाट मोकळी करून द्यावी लागली. गोळीबारात हेमंत मेश्राम यांचे वृद्ध वडील जखमी झाले. या घटनेत २८ हजारांची रक्कम चोरी गेली असली तरी एकूणच घटनाक्रम अंगावर शहारे आणणारा आहे. यवतमाळ शहरातील घरफोड्या या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. यातही अवधूतवाडी पोलीस ठाण्याचा क्रमांक १ आहे. येथील शिंदेनगरमध्ये ३० नोव्हेंबरला ६७ हजारांची घरफोडी झाली. त्यानंतर सत्यनारायण ले-आऊटमध्ये पाच लाख २१ हजारांचा मुद्देमाल चोरी गेल्याचे पोलिसांनी रेकॉर्डवर घेतले आहे. प्रत्यक्ष गणेश जाधव यांच्या घरुन ३०० ग्रॅम सोने व ७० हजार रुपये रोख असा ११ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला. गुन्ह्याची तीव्रता दडपण्याचे काम पोलिसांकडून होत आहे. त्यानंतर ५ डिसेंबरला भोसा परिसरात घरफोडून ३८ हजार लंपास केले. दुसऱ्याच दिवशी ६ डिसेंबरला सिद्धेश्वरनगर येथून सहा लाखांची रोख चोरुन नेली.
या पाठोपाठ यवतमाळ शहर ठाण्याच्या हद्दीतही चांदोरानगरमध्ये पाच हजार ९०० रुपये, विशालनगर पिंपळगाव येथील ९ हजार ५०० रुपये, पिंपळगावमध्ये ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. उमरखेड येथील सिद्धेश्वर वार्ड येथे दोन लाख सात हजारांची घरफोडी झाली आहे. घाटंजी शहरातही ५७ हजारांची घरफोडी आहे. दिग्रस शहरातील श्रीराम विहारमध्ये चार लाख ८७ हजारांची घरफोडी चोरट्यांनी केली. विशेष म्हणजे यवतमाळ शहर ठाण्यातील घरफोडी व्यतिरिक्त एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही.
पुसदमध्ये तर चोरट्यांचा गोळीबार चांगलाच गाजला. त्याउपरही पोलिसांना या चोरट्यांचा सुगावा मिळालेला नाही. एकीकडे सतत होणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिक दहशतीत आहे. तर यवतमाळ शहर ठाण्यात अटक करण्यात आलेल्या घरफोड्यांची टोळी ही रेकॉर्डवरचीच असल्याची धक्कादायकबाब उघडकीस आली आहे.
गावातील सक्रिय गुन्हेगार कोण, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या काय हालचाली आहे, याची माहिती घेतली जात नाही. त्यातूनच सातत्याने घरफोडी सारखा प्रकार होत असल्याचा संयश व्यक्त केला जात आहे. पोलिसांची गुन्हेगार कोणतीच पकड नसल्याचे स्पष्ट होते. दररोज घरफोडी सारखे गुन्हे दाखल होऊनही कारवाई नामशून्य असते. चोरट्यांचा साधा मागही पोलिसांना मिळू नये यापेक्षा मोठी नामुष्की काय.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींकडे दुर्लक्ष
या चारही चोरट्यांनी अल्पवयीन असतानाही चोरी सारखे गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे. त्यानंतरही रेकॉर्डवर असलेल्या या गुन्हेगारांनी तब्बल १५ घरफोड्या केल्या. सतत घरफोडीचे गुन्हे नोंद होत असूनही रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांची सद्यस्थिती काय, ते कशात व्यस्त आहे याकडे पोलिसांनी साफ दुर्लक्ष केले. त्यामुळेच कालचे बाल गुन्हेगार आज सराईत चोर बनल्याचे उघड झाले आहे. बरेचदा गुन्हेगार बाहेरचे आहेत असे सांगून स्थानिक पोलीस वेळ मारुन नेतात.

प्रमुख रस्त्यांवरच पोलिसांची रात्रगस्त
आता घरफोड्यांचे सत्र वाढल्याने पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रात्रगस्तीवर विशेष वॉच आहे. रात्रगस्तीत पोलीस प्रमुख मार्गांवरच फिरतात हे हेरुनच अंतर्गत भागातील रस्त्यांवरून किंवा शहराच्या लगतच्या झुडूपी जंगलातून चोरीसाठी घराबाहेर पडत असल्याची कबुली शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी दिली. घरफोडी केल्यानंतर पोत्यात भरलेला मुद्देमाल पाठीवरून वाहून नेला जात होता. कुणाच्या नजरेत न येण्यासाठी थेट शहरातील अरुंद व दाट वस्तीतील रस्ते किंवा झुडूपी जंगलातून ठिकाण गाठत असल्याचे या चोरट्यांनी सांगितले. त्यामुळे प्रमुख रस्त्यावर रात्रगस्त करणाºया पोलिसांची कोणतीच अडचण नव्हती, असाही खुलासा या आरोपींनी केला.

Web Title: 21 lakh burglaries in eight days in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.