दुष्काळ व विम्याचे १८४ कोटी

By Admin | Updated: February 8, 2015 23:39 IST2015-02-08T23:39:03+5:302015-02-08T23:39:03+5:30

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या मदतीच्या दुसऱ्या टप्प्याचे १२२ कोटी ८० लाख आणि हवामानावर आधारित पीक

184 crores of drought and insurance | दुष्काळ व विम्याचे १८४ कोटी

दुष्काळ व विम्याचे १८४ कोटी

७ मार्चपूर्वी वितरण : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा, प्रशासन लागले कामाला
यवतमाळ : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या मदतीच्या दुसऱ्या टप्प्याचे १२२ कोटी ८० लाख आणि हवामानावर आधारित पीक विम्याचे ६१ कोटी १५ लाख असे एकूण १८३ कोटी ९५ लाख रुपये प्राप्त झाले आहे.
दुष्काळी मदतीचे वितरण ७ मार्चपूर्वी करण्याचे आदेश असून पीक विम्याची रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली जाणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अपुऱ्या पावसाने आठ लाख हेक्टरवरील पीक होरपळले होते. यातून पाच लाख शेतकरी कुटुंब संकटात सापडले होते. या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातील १२२ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला. आता त्या पाठोपाठ १२२ कोटी ८० लाख रुपये मदतीचा दुसरा टप्पाही जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. ६ फेब्रुवारी रोजी हा निधी तहसीलदारांकडे वळता करण्यात आला आहे. सदर निधी ७ मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रशासन त्या दृष्टीने कामाला लागले आहे.
यवतमाळ तालुक्यासाठी ८ कोटी २६ लाख, कळंब ६ कोटी ७१ लाख, बाभूळगाव पाच कोटी ८५ लाख, आर्णी सात कोटी ९१ लाख, दारव्हा आठ कोटी ९७ लाख, नेर सात कोटी ५७ लाख, दिग्रस ५ कोटी ९२ लाख, पुसद १० कोटी १७ लाख, उमरखेड ७ कोटी नऊ लाख, महागाव ७ कोटी ९० लाख, राळेगाव ८ कोटी २७ लाख, घाटंजी ९ कोटी १३ लाख, केळापूर ६ कोटी ७७ लाख, झरी ५ कोटी ८० लाख, वणी ९ कोटी १८ लाख आणि मारेगाव ६ कोटी चार लाख असे १२२ कोटी ८४ लाख रुपये प्राप्त झाले आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ही मदतही अपुरीच ठरणारी आहे. (शहर वार्ताहर)
दीड लाख शेतकऱ्यांना विम्याचा लाभ
जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या हवामानावर आधारित पीक विमा योजनेतून दीड लाख शेतकऱ्यांना ६१ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. याचा लाभा जिल्ह्यातील १६ तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला असून ही रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली जाणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार ६०१ शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. या शेतक ऱ्यांना नुकसानीपोटी ६१ कोटी १५ लाख ६० हजार १२० रुपयांची मदत दिली जाणार आहे. कापसाची लागवड करणारे ८१ हजार ७९३ शेतकऱ्यांना ५२ कोटी ३९ लाख ५८ हजार ७६ रूपयांची मदत दिली जाणार आहे. यामध्ये आर्णी, बाभूळगाव, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, कळंब, केळापूर, महागाव, मारेगाव, नेर, पुसद, राळेगाव, उमरखेड, वणी आणि झरी तालुक्याचा यामध्ये समावेश आहे. सोयाबीन उत्पादक ६६ हजार १७८ शेतकऱ्यांना ८ कोटी ७१ लाख ७१ हजार १५९ रूपयांची मदत शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. मुगाची पेरणी करणाऱ्या ३७४ शेतकऱ्यांना २ लाख ७७ हजार २१४ रूपयांचा पीक विमा दिला जाणार आहे. यामध्ये आर्णी, बाभुळगाव, दारव्हा, घाटंजी, कळंब, महागाव, नेर, यवतमाळ आणि झरी तालुक्याचा समावेश आहे. उडीद पिकाचे २५६ शेतकऱ्यांना एक लाख ५३ हजार ६६९ रुपये मिळणार आहे.

Web Title: 184 crores of drought and insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.