कामगारांच्या उपोषणाचा १६ वा दिवस
By Admin | Updated: April 1, 2015 02:03 IST2015-04-01T02:03:28+5:302015-04-01T02:03:28+5:30
विविध मागण्यांसाठी यवतमाळ पालिकेतील सफाई कामगारांनी सुरू केलेल्या उपोषणाचा मंगळवारी १६ वा दिवस उजाडला आहे.

कामगारांच्या उपोषणाचा १६ वा दिवस
यवतमाळ : विविध मागण्यांसाठी यवतमाळ पालिकेतील सफाई कामगारांनी सुरू केलेल्या उपोषणाचा मंगळवारी १६ वा दिवस उजाडला आहे. संत गाडगेबाबा नगरपरिषद अस्थाई कामगार विकास संघटनेच्या पुढाकारात २३६ कामगारांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
किमान वेतन कायद्यानुसार दररोज ३०० रुपये मजूरी मिळावी, भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा भरणा करावा या व इतर मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहे. या पालिकेच्या सफाईचा कंत्राट तीन कोटी ४७ लाख रुपयांचा देण्यात आला आहे.
कार्यरत २३६ कामगारांना किमान ३०० रुपये रोज देवूनही कंत्राटदाराला वार्षिक एक कोटी रुपये मिळतात. परंतु नगरपरिषद या कंत्राटदारावर कारवाई करत नाही. कंत्राट घेणारा व्यक्ती पालिकेच्या आस्थापनेवर सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. एवढेच नव्हे तर आंदोलन सुरू असताना कंत्राट देण्यात आला. हा कामगारांवरील मोठा अन्याय असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
दररोज १२० रुपये मिळत असल्याने सफाई कामगारांना आपल्या कुटुंबाचा खर्च भागविताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. पाल्यांचे शिक्षण, आरोग्य याविषयावर होणाऱ्या खर्चातून जवळ काहीही रक्कम शिल्लक राहात नाही. अशाही परिस्थितीत नाईलाजाने काम करावे लागत आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)