‘आधार’चे १६ अंक बनले ओळख
By Admin | Updated: October 5, 2016 00:21 IST2016-10-05T00:21:57+5:302016-10-05T00:21:57+5:30
प्रत्येक व्यक्ती जीवनात उपयोगी पडणारे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जीवाचा आटापीटा करीत असतो.

‘आधार’चे १६ अंक बनले ओळख
आधार कार्डचे महत्त्व वाढले : ठिकठिकाणी होतेय मागणी
वणी : प्रत्येक व्यक्ती जीवनात उपयोगी पडणारे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जीवाचा आटापीटा करीत असतो. यामध्ये बहुतेक करून शैक्षणिक प्रमाणपत्रांचा भरणा असतो. परंतु आता आधार कार्डाने या सर्व प्रमाणपत्रांना मागे टाकून माणसाच्या जीवनात अग्रस्थान मिळविले आहे. आता आधार कार्डाविना जीवनात कोठेच आधार लागत नसाल्याचे अनुभव सर्वांनाच येवू लागले आहे. आता माणुस नावाने नव्हे, तर आधार कार्डावरील १६ अंकी संख्येने ओळखला जावू लागला आहे.
कधीकाळी शिक्षणातील एक-दोन पदव्या, पदविका किंवा प्रमाणपत्रे माणसांजवळ असणे ही बाब त्याला भूषणावह ठरत होती. त्यामुळे प्रत्येकच व्यक्ती पदवी, पदविका व प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. आता असे पदवी, पदविका, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मार्ग काही अंशी सोपे झाले आहे. ही प्रमाणपत्रे बाजारात विकतही मिळत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहे. त्यामुळे या प्रमाणपत्रांची किंमतही कमी झाली आहे.
विज्ञानाच्या प्रगतीने मानवाच्या गजरांमध्येही झपाट्याने बदल झाले. दळणवळणचे प्रभावी माध्यम म्हणून प्रत्येकाच्या हातात भ्रमणध्वनी आला आणि माणुस नावापेक्षा नंबरने ओळखला जावू लागला. भ्रमणध्वनीचा १० अंकी नंबर हा त्या व्यक्तीची ओळख बनली. माणसांची मुख्य ओळख त्याचे नाव हीच होती. त्यामुळे मानवाच्या जीवनात नामकरण विधीला अधिक महत्त्व होते. व्यक्ती जन्माला आल्यावर त्याला साजेशे नाव शोधण्यासाठी आईवडीलांची धडपड असायची.
त्यासाठी भविष्यकारांचीही मदत घेऊन राशीवरून नाव काढले जायचे. मग राशीवरून ठेवलेले नाव आणि आवडते नाव, अशी दोन नावेही व्यक्तीला लावली जायची. कोणालाही नावाने हाक मारताना त्यामध्ये जिव्हाळा, आपुलकी याचे दर्शन व्हायचे. आता माणुस नावापेक्षा नंबरनेच अधिक ओळखला जाऊ लागला. भ्रमणध्वनीचा १० अंकी नंबर व आधार कार्डाचा १६ अंकी नंबर हीच मानवाची ओळख ठरू लागली.
आता आधार कार्डाचे महत्त्व, तर शासनाने एवढे वाढवून दिले की, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक कामात त्याचीच मागणी होऊ लागली. व्यक्तीचे बँकेचे खाते, गॅसचा क्रमांक, शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र सर्वांशी आधार कार्ड क्रमांक लिंक करणे आवश्यक करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश, त्याला मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती यांचा संबंध आधार कार्डाशी जोडण्यात आला. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची जबाबदारी संबंधित शाळेवर टाकण्यात आली. वारंवार दर महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची माहिती शाळांना मागविली जात आहे.
आता विद्यार्थ्यांची सरलवर भरलेली माहिती आधार कार्डाशी जोडावी लागत आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ज्या बँक खात्यात जमा होते, ते खाते आधार कार्डाशी लिंक केल्याशिवाय शिष्यवृत्ती खात्यात जमा होणार नाही, अशा सूचना संबंधित विभागाकडून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षीपासून १० वी व १२ वीची आवेदपनपत्र भरताना विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक टाकणे अनिवार्य केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बोगसबाजीला बसला चाप
आधारकार्ड लिंकींगमुळे बऱ्याच अंशी बोगसबाजीला लगाम लागल्याचे दिसून येत आहे. बँकेचे प्रत्येक खाते आधार कार्डाशी लिंक करावे लागत असल्याने प्राप्तीकर व आयकर विभागाची प्रत्येकावरच करडी नजर आहे. काळ्या पैशांवर या विभागाचा निशाणा राहणार आहे. शाळेमधील विद्यार्थ्यांच्या बोगस प्रवेशाला आळा बसला आहे. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक आश्रमशाळांचे पितळ उघडे पडले आहे. एकच विद्यार्थी अनेक शाळांमध्ये प्रवेशित दाखविण्याला पायबंद बसला आहे. एकाच मतदाराचे दोन मतदार यादीत नाव असणे थांबले जाणार आहे. एलपीजी गॅसचा दुरूपयोग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.