१४ हजार रूग्णांनी घेतला जीवनदायीचा लाभ
By Admin | Updated: September 2, 2015 04:05 IST2015-09-02T04:05:57+5:302015-09-02T04:05:57+5:30
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा जिल्ह्यातील १४ हजार १६८ रूग्णांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे.

१४ हजार रूग्णांनी घेतला जीवनदायीचा लाभ
यवतमाळ : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा जिल्ह्यातील १४ हजार १६८ रूग्णांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील विविध रूग्णालयांमध्ये ३ हजार २८३ तर १० हजार ८८५ रूग्णांनी राज्यातील इतर अंगीकृत रूग्णालयांमध्ये जाऊन या योजनेअंतर्गत उपचार घेतले आहे. दिवसेंदिवस रूग्णांचा या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या जिल्ह्यात नऊ रूग्णालयांमध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविली जात आहे. यामध्ये यवतमाळ येथील सहा तर पुसद येथील दोन व वणी येथील एका रूग्णालयाचा समावेश आहे. यवतमाळ येथील पाचशे खाटांची सोय असलेल्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयासह हिराचंद मुणोत मेमोरीअल क्रिटीकेअर हॉस्पिटल (१०० खाटा), साईश्रद्धा मल्टीस्पेशालिटी रूग्णालय (३० खाटा), तावडे रूग्णालय (५० खाटा), राठोड हॉस्पिटल शिशू रूग्णालय (३१ खाटा) व शांती आॅर्थाेपेडीक रूग्णालय (२५ खाटा) आदींचा समावेश आहे. पुसद येथील क्रिष्णा बाल रूग्णालय (३० खाटा) व लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी रूग्णालय (१०० खाटा) तसेच वणी येथील सुगम रूग्णालय (१०० खाटा) या रूग्णालयांचा योजनेत समावेश आहे. जिल्ह्यातील या नऊ संलग्नित रूग्णालयातच जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ रूग्णांना मिळू शकतो.
या सर्व रूग्णालयांमध्ये योजनेतील पात्र रूग्णांना खाटा, निदान सेवा, भुल तज्ज्ञसेवा, शस्त्रक्रिया, औषधोपचार, भोजन व एक वेळेसचा परतीचा प्रवास खर्च या सर्व सुविधा कोणत्याही शुल्काशिवाय दिल्या जातात.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना यवतमाळ जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ पासून सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत ९७१ प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार व १२१ प्रकारच्या आजारांचा पाठपुरावा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत लाभार्थी रूग्णांना दीड लाख रूपयांपर्यंत विमा संरक्षण आणि मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी दोन लाख ५० हजारापर्यंतचा लाभ समाविष्ठ आहे. (प्रतिनिधी)
योजनेचा लाभ कुणाला?
४राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी आरोग्य विभागाने काही निकष ठरविले आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी सबंधीत लाभार्थी रूग्णाजवळ पिवळे/केशरी/अन्नपुर्णा/अंत्योदय शिधापत्रिका व शासनमान्य ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्यात नऊ रूग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो. या सर्व रूग्णालयांमध्ये आरोग्य मित्र रूग्णांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत. रूग्णांनी माहिती व मदतीसाठी या आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा.