‘वसंत’ कारखान्याला १३ कोटींचे कर्ज मंजूर
By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:02+5:302015-12-05T09:09:02+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पोफाळीच्या वसंत सहकारी साखर कारखान्याला १३ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.

‘वसंत’ कारखान्याला १३ कोटींचे कर्ज मंजूर
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पोफाळीच्या वसंत सहकारी साखर कारखान्याला १३ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. बँक संचालकांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वसंत साखर कारखान्याकडून पूर्व हंगामी कर्ज व साखर मालतारण कर्जाच्या नूतणीकरणाचा प्रस्ताव जिल्हा मध्यवर्ती बँकेला देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून हा विषय संचालक मंडळाच्या बैठकीत मांडला जात होता. मात्र त्यावर निर्णय होऊ शकला नाही. शुक्रवारीसुद्धा संचालकांच्या बैठकीत वसंत साखर कारखान्याचा विषय चर्चिला गेला. या कर्जाला एका संचालकाने मात्र विरोध दर्शविला.
कारखान्याकडून १६ कोटी ५० लाख रुपयांच्या पूर्व हंगामी कर्जाची मागणी केली गेली. मात्र बँकेने त्यात साडेतीन कोटींची कपात करून १३ कोटी रुपये कर्ज देण्याचे मान्य केले. याशिवाय साखर मालतारणातील ४० कोटींच्या कर्जाचे नूतणीकरण केले गेले.
कारखान्याकडे यातील ३३ कोटी रुपयांचे कर्ज शिल्लक असून तेवढ्याच रकमेची साखरही तारण म्हणून असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. जिल्हा बँकेने कर्ज मंजूर केल्याने वसंत सहकारी साखर कारखान्याची आर्थिक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. या कर्ज मंजुरीकडे कारखान्याची यंत्रणा व ऊस उत्पादकांच्या नजरा लागल्या होत्या. (जिल्हा प्रतिनिधी)