१२८ शिक्षक जाणार जिल्ह्याबाहेर

By Admin | Updated: June 13, 2017 01:18 IST2017-06-13T01:18:09+5:302017-06-13T01:18:09+5:30

जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आॅनलाईन करण्यात आल्या.

128 teachers will go out of the district | १२८ शिक्षक जाणार जिल्ह्याबाहेर

१२८ शिक्षक जाणार जिल्ह्याबाहेर

आंतरजिल्हा बदली : रोस्टरच पूर्ण न झाल्याने प्रत्यक्ष पदस्थापनेबाबत संभ्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आॅनलाईन करण्यात आल्या. सोमवारी ग्रामविकास विभागाने केलेल्या प्रक्रियेत जिल्ह्यातील १२८ शिक्षकांचा समावेश असून ते आता जिल्ह्याबाहेर जाणार आहेत. परंतु, जिल्ह्यातील रोस्टरच पूर्ण झालेले नसताना या शिक्षकांच्या बदलीची पुढील कागदोपत्री प्रक्रिया अडण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गृहजिल्ह्यात जाण्यासाठी शिक्षक प्रतीक्षेत होते. परंतु, रोस्टरच पूर्ण झालेले नसल्याने आंतरजिल्हा बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. यंदा ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी इच्छूक शिक्षकांकडून ‘सरल’वर माहिती मागविण्यात आली होती. अखेर सोमवारी १२ जून रोजी शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया आॅनलाईन पूर्ण करण्यात आली. बदली झालेल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची यादी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली.
यात यवतमाळ जिल्हा परिषदेतील १२८ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे. ११७ शिक्षक मराठी माध्यमाचे तर ११ उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा यात समावेश आहे. सोमवारी बदल्यांची यादी अंतिम झाली. मात्र, प्रत्यक्ष बदली होण्यापूर्वी शिक्षकांच्या अर्जांची आणि कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांना संबंधित जिल्ह्यात पदस्थापना मिळणार आहे. परंतु, कागदपत्रांची पडताळणी करतानाच जिल्ह्याच्या अपूर्ण रोस्टरचा मुद्दा अडथळ्याचा ठरणार आहे. विभागीय आयुक्तांकडे रोस्टरचा प्रश्न यापूर्वीच शिक्षक संघटनांनी मांडला असता आयुक्तांनी रोस्टर पूर्ण करण्याचे निर्देश सीईओंना दिले होते. मात्र, सोमवारी प्रत्यक्ष बदलीची आॅनलाईन प्रक्रिया झालेली असतानाही रोस्टर पूर्ण करण्याबाबत दिरंगाईच दिसून आली.
शिवाय, बदली झालेल्या १२८ जणांमध्ये जे मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक आहेत, त्यांना उपशिक्षक म्हणून पदावनत केल्यानंतरच बदलीच्या ठिकाणी त्यांना पदस्थापना मिळणार आहे.

येणाऱ्या ३०० शिक्षकांसाठी फक्त ३७ रिक्तपदे
आॅनलाईन बदल्या झालेल्या असल्या तरी रोस्टर पूर्ण न झाल्याने प्रत्यक्ष बदल्या कठीण आहे. यवतमाळसह चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांचे रोस्टरच पूर्ण झाले नसून तेथील रिक्त पदांची स्थिती स्पष्ट झालेली नाही. यवतमाळात इतर जिल्ह्यातून बदली झालेल्या शिक्षकांची संख्या आॅनलाईन प्रक्रियेत सुमारे तीनशे आहे. पण यवतमाळ जिल्हा परिषदेने आयुक्तांकडे पाठविलेल्या रोस्टरमध्ये केवळ खुल्या प्रवर्गातील ३७ पदे रिक्त दाखविण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळातून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या आणि इतर जिल्ह्यातून यवतमाळात येणाऱ्या शिक्षकांचा प्रत्यक्ष पदस्थापनेचा मार्ग खडतर झाला आहे.
३६ शिक्षक जाणार विदर्भाबाहेर
आंतरजिल्हा बदलीच्या यादीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील ९२ शिक्षक विदर्भातीलच इतर जिल्ह्यात जाणार आहेत. तर ३६ शिक्षक विदर्भाबाहेर जाणार आहेत. यात अमरावती जिल्ह्यात २१, अकोला ३, वाशीम २६, नागपूर ३, वर्धा ७, चंद्रपूर १०, बुलडाणा १०, नांदेड १४, हिंगोली जिल्ह्यात ६ शिक्षकांची बदली झाली आहे. तसेच सोलापूर, परभणी, बिड, अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर गडचिरोली, उस्मानाबाद, औरंगाबाद, पुणे, जळगाव, जालना, सिंधुदुर्ग, ठाणे, नंदूरबार जिल्ह्यात एक-एक शिक्षक जाणार आहे. उर्दू माध्यमाच्या ११ पैकी ८ शिक्षक अमरावती तर ३ शिक्षक वाशीममध्ये जातील.

Web Title: 128 teachers will go out of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.