१२३ कोटींचा बोर्डा प्रकल्प ठरलाय पांढरा हत्ती

By Admin | Updated: June 15, 2016 02:51 IST2016-06-15T02:51:29+5:302016-06-15T02:51:29+5:30

वणी तालुक्यातील निर्गुडा नदीवर सन १९८८ मध्ये जवळपास १२३ कोटी रुपये खर्च करून बांधलेला बोर्डा प्रकल्प आजवर एक एकर जमिनीचीही तहान भागवू शकला नाही.

123 crore boarded white projected white elephant | १२३ कोटींचा बोर्डा प्रकल्प ठरलाय पांढरा हत्ती

१२३ कोटींचा बोर्डा प्रकल्प ठरलाय पांढरा हत्ती

कोट्यवधी पाण्यात : निर्गुडा नदीवर जिआॅलॉजिकल सर्वेशिवाय प्रकल्प उभारणी केल्याचा आरोप
यवतमाळ : वणी तालुक्यातील निर्गुडा नदीवर सन १९८८ मध्ये जवळपास १२३ कोटी रुपये खर्च करून बांधलेला बोर्डा प्रकल्प आजवर एक एकर जमिनीचीही तहान भागवू शकला नाही. या प्रकल्पाच्या उभारणीतील चौकशीच्या मागणीसाठी अनेकांनी वेळोवेळी आंदोलने, उपोषणे केली परंतु त्यांचा गांभिर्याने विचारच करण्यात आला नसल्याने यापुढे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता या क्षेत्रातील अभ्यासकांनी वर्तविली आहे.
वणी तालुक्यात निर्गुडा नदीवर बारा मीटर उंच, ७६० मिटर लांबीचा प्रकल्प उभारण्यात आला. त्यासाठी कोट्यवधीचा खर्च करण्यात आला आहे. परंतु हे धरण भरल्यानंतर केवळ पंधरा दिवसात धरणातील पाणी गायब होत असल्याचे या प्रकरणी अनेक आंदोलने करणारे पाटंबधारे विभागाचेच सेवानिवृत्त कर्मचारी चोखोबा नगराळे रा. बांगर नगर, यवतमाळ यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात वीस टक्के जमिन सिंचनाखाली असावी, असे अपेक्षित असताना सर्व लघू, मध्यम व मोेठे असे ६८ प्रकल्प मिळून आजमितीला केवळ ३५ हजार हेक्टर म्हणजे सात टक्के शेतजमिन ओलिताखाली असल्याचा दावा सेंटर फॉर जस्टिस या संस्थेने केला आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील ही परिस्थिती अतिशय आश्चर्यकारक आहे. त्यामुळे जिआॅलॉजिकल सर्वे केल्याशिवाय कोणताही छोटा किंवा मोठा प्रकल्प उभारल्याच जाऊ नये, असा विशेष आदेश जिल्हा प्रशासनाने काढावा व बोर्डाच्या सर्वेला टाळाटाळ करणाऱ्या तत्कालीन अभियंत्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी सेंटर फॉर जस्टिसने जिल्हाधिकारी व पाटंबधारे विभागाकडे केली आहे.
या संदर्भात संस्थेने मिळविलेल्या माहितीनुसार बोर्डा प्रकल्पस्थळी चुनखडकाच्या मोठ्या गुहा व अनेक ठिकाणी भेगा असल्याचे सर्वेक्षण अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिआॅलॉजिकल सर्वे आॅफ इंडिया नागपूर, भाभा अनुसंधान केंद्र मुंबई, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अमरावती, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिक, औरंगाबादचे भूगर्भतज्ञ्ज डॉ. करमकर, अमरावतीचे डॉ. मुखर्जी व नागपूरचे डॉ. देशमुख आदी संस्था आणि व्यक्तींनी तीन वर्षे परिश्रम घेऊन हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. ५ आॅगस्ट १९९६ चा मंत्रीस्तरावरील भूकंप चर्चेचा अहवालही पाटबंधारे खात्याने आता जनतेपुढे उघड करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रकल्पावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च आज व्यर्थ ठरला आहे. (प्रतिनिधी)

‘काला पत्थर’शी साधर्म्य
सन १९७९ मध्ये अमिताभ बच्चन, शशीकपूर अभिनित ‘काला पत्थर’ हा हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात दाखविलेली कोळसा खाण जमिनित गाडल्या जाऊन मोठ्या प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी होते, असे दृश्य सिनेमात होते. ही जरी सिनेमातील कहाणी असली तरी वणी येथील बोर्डा प्रकल्पाची चौकशी करून आत्ताच त्याचा सोक्षमोक्ष न लावल्यास या प्रकल्पा शेजारी असलेल्या कोळसा खदानीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि काला पत्थर सिनेमातील कथा प्रत्यक्षात उतरू शकते, अशी भिती या प्रकल्पाच्या चौकशीसाठी आयुष्यभर लढा देणारे सेवानिवृत्त पाटबंधारे कर्मचारी चोखोबा नगराळे यांनी ‘लोकमत’ सोबत बोलताना व्यक्त केली.

Web Title: 123 crore boarded white projected white elephant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.