प्रसंगावधान राखून यवतमाळातील व्यापाऱ्याने वाचवले १२ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:26 IST2020-02-18T14:23:27+5:302020-02-18T14:26:01+5:30
सोमवारी रात्री १२ लाखांची रोकड घेऊन यवतमाळ शहराच्या पाटीपुरा भागातील व्यापारी घरी जात असताना या तीन युवकांनी त्याचा पाठलाग केला. लुटमार होण्याची चिन्हे दिसताच या व्यापाऱ्याने आपल्याकडील बॅग एका घरात सुरक्षितरीत्या फेकली. त्यामुळे ही रक्कम वाचली.

प्रसंगावधान राखून यवतमाळातील व्यापाऱ्याने वाचवले १२ लाख
हरिओम बघेल
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहराच्या पाटीपुरा भागातील तीन युवक लुटमारीच्या उद्देशाने आर्णीत सक्रिय झाले. सुमारे दहा दिवसांपासून त्यांनी आणीर्तील एका किराणा व पान मटेरियलच्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवली. याची कल्पना त्या व्यापाऱ्याला आल्याने हा व्यापारी सावध होता. सोमवारी रात्री १२ लाखांची रोकड घेऊन व्यापारी घरी जात असताना या तीन युवकांनी त्याचा पाठलाग केला. लुटमार होण्याची चिन्हे दिसताच या व्यापाऱ्याने आपल्याकडील बॅग एका घरात सुरक्षितरीत्या फेकली. त्यामुळे ही रक्कम वाचली. त्यानंतर या तीन युवकांना पकडण्यात आले.
अक्रम घोरी असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते आणीर्तील अमराईपुरा येथील रहिवासी आहेत. डोंगा कॉलनी भागात त्यांचे किराणा व पान मटेरियलचे दुकान आहे. दोन-तीन युवक मोटर सायकलने त्यांच्या मागावर असल्याची जाणीव त्यांना ७ फेब्रुवारीला झाली. संभाव्य धोका लक्षात आल्याने घोरी यांनी बाहेर जाताना सुरक्षेच्या दृष्टीने आपल्यासोबत नेहमी दोन जण ठेवण्याचे ठरविले. सोमवारी दुकान बंद करून ते मोटर सायकलने आपल्या दोन सहकाऱ्यांसह घराकडे जात होते. तेव्हा एका मोटरसायकलवरील तीन युवक त्यांचा पाठलाग करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या मोटरसायकलवरील नंबर प्लेटवर पांढरा रंग मारलेला होता. तीनही युवकांचा चेहरा कापडाने झाकला होता. संभाव्य धोका ओळखून त्यांनी आपल्याजवळील १२ लाखांची रोकड असलेली बॅग अमराईपुरा येथे घराच्या एरियात पोहोचताच ओळखीच्या एका घरात फेकली. त्यानंतर पाठलाग करणाऱ्या या युवकांना पकडले. ७ फेब्रुवारीलासुद्धा पाठलाग करणारे हेच तीन युवक असल्याची खात्री त्यांना पटली. यावेळी झालेल्या गदीर्तील एकाने या तिघांपैकी एकाला ओळखले. तो यवतमाळच्या पाटीपुरा भागातील रहिवासी आहे. चौकशीदरम्यान तीनही युवक पाटीपुरातील असल्याचे त्यांनी सांगितले. रात्री ११ वाजता या युवकांना आर्णी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र ठाणेदार यशवंत बावीस्कर रजेवर असल्याने उपस्थित पोलिसांनी संशयित व तक्रारकर्त्यांना सोडून देऊन मंगळवारी येण्यास सांगितले. घटना घडली नाही, पैसे नेले नाही, मग गुन्हा कसा नोंदवायचा असा पोलिसांचा सूर होता. पोलिसांनी ठाण्यात आलेल्यांना समजूत घालून रवाना केले. अप्रत्यक्षरीत्या गुन्हा नोंदविणे टाळले जात होते. अशाच पद्धतीने आर्णीत गंभीर गुन्हे दडपले जात आहे. आणीर्तील व्यापाऱ्यांनी अक्रम घोरी यांना पोलिसात फिर्याद नोंदविण्याचा सल्ला दिला आहे. सर्व व्यापारी त्यासाठी सोबत असल्याची ग्वाहीही घोरी यांना दिली.
आणीर्तील ही घटना सर्वच व्यापाऱ्यांनी सकाळी दुकानात येताना व रात्री घरी जाताना सावधता बाळगण्याचा संदेश देणारी ठरली आहे.