12 crore fund for the development of the jail | कारागृह विकासासाठी १२ कोटींचा निधी

कारागृह विकासासाठी १२ कोटींचा निधी

ठळक मुद्देनूतनीकरण होणार । महिलांसाठी स्वतंत्र बराक

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील ब्रिटिशकालीन कारागृहात दुरूस्त्या करण्यासाठी जिल्हा नियोजन विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतून १२ कोटी रूपये मंजूर केले आहेत. कारागृहाच्या सुरक्षेसाठी वॉच टॉवर उभारले जाणार आहे. यासोबतच महिलांसाठी स्वतंत्र बराक, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने नव्याने उभारले जाणार आहे.
यवतमाळचे कारागृह दोन हेक्टरमध्ये आहे. या कारागृहाची क्षमता २०८ कैद्यांची आहे. मात्र, या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त कैदी असतात. यामुळे सुविधा अपुऱ्या पडतात. खास करून महिलांच्या बराकींमध्ये उपाययोजनांची गरज आहे. नाविन्यपूर्ण योजनेमधून महिला बराकी दुरूस्तीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
यासोबतच कारागृहातील रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम, कैद्यांची संख्या अधिक असल्याने पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी नवीन टाकी, वाढीव स्वयंपाकघर यासह विविध बाबींचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक बराकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची संख्या वाढविली जाणार आहे. कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अतिशय जुनी आहेत. मध्यंतरी यावरचे टिन उडाले होते. जागाही अपुरी आहे. क्वार्टरची दुरूस्ती होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

वॉच टॉवरवरून कारागृहावर नजर
सीसीटीव्ही कॅमेरासोबत वॉच टॉवरच्या माध्यमातून कारागृहावर पाळत ठेवली जाणार आहे. एका कर्मचाºयाची नियुक्ती राहणार आहे. या ठिकाणावरून कारागृहाच्या आत आणि बाहेरील भागात २४ तास तगडी सुरक्षा राहणार आहे.

कारागृहात गत अनेक वर्षांपासून काही बाबींमध्ये दुरूस्ती करणे गरजेचे होते. यामुळे कारागृह प्रशासनाने दुरूस्तीचा प्रस्ताव आणि नवीन उपाय योजनांची सूचना केली. त्यानुसार नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा नियोजन विभागाकडे आराखडा सादर करण्यात आला होता. आराखड्यातील उपाय योजनामुळे कारागृहाची सुरक्षितता वाढेल.
- कीर्ती चिंतामणी
कारागृह अधीक्षक, यवतमाळ

Web Title: 12 crore fund for the development of the jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.