वणी तालुक्यातील ११ हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:03+5:30
२२ कोटी रूपयांचे अनुदान स्थानिक प्रशासनाच्या तिजोरीत प्राप्त झाले असून त्याचे वाटप केले जात आहे. असे असले तरी अद्याप ११ हजार शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेले सात कोटी रूपये शासनाकडून अप्राप्त असल्याने संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.

वणी तालुक्यातील ११ हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा
संतोष कुंडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : दिवाळीच्या पर्वात या भागात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शासनाने मदत जाहीर केली. या मदतीतील २२ कोटी रूपयांचे अनुदान स्थानिक प्रशासनाच्या तिजोरीत प्राप्त झाले असून त्याचे वाटप केले जात आहे. असे असले तरी अद्याप ११ हजार शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेले सात कोटी रूपये शासनाकडून अप्राप्त असल्याने संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.
सन २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात या भागात प्रचंड अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा फटका सोयाबीन आणि कपाशीला मोठ्या प्रमाणावर बसला. वणी तालुक्यातील १६१ गावातील ३१ हजार ६२६ शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे उभे पीक सडून गेले. कपाशी पिकाचेही नुकसान झाले. शेतकऱ्यांची एकूण परिस्थिती लक्षात घेता, शासनाने अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्यानुसार सुरूवातीला पहिल्या टप्प्यात सात कोटींचा निधी प्राप्त झाला. त्याचे वाटप सुरू असतानाच दुसऱ्या टप्प्यातील १४ कोटी ९९ लाख, असे एकूण २१ कोेटी ९९ लाख रूपये शेतकऱ्यांसाठी प्राप्त झाले. हा निधी प्राप्त होताच स्थानिक प्रशासनाने आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या निर्दोष करून त्या बँकेकडे पाठविल्या. त्यानुसार वाटप सुरू झाले ेआहे. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांना मदतीचे अनुदान मिळाले नाही. २१ कोटी ९९ लाखाचे अनुदान २० हजार ८५५ शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. सात कोटी रूपयांचा तिसरा टप्पा प्राप्त झाल्यानंतर उर्वरित ११ हजार शेतकºयांना मदत दिली जाईल.
पूरबाधित शेतकºयांना दीड कोटीचे वाटप
सन २०१८ मध्ये जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला. यामुळे नदी-नाल्याच्या काठावरील शेतात पाणी शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाले. जवळपास सहा हजार ५१ हेक्टरवरील पिकाला बाधा पोहोचली. त्या शेतकऱ्यांना नुकतेच दीड कोटींचे अनुदान वाटप करण्यात आले.