व्यायामाला गेले अन् हृदयविकाराने नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभियंत्रिकीचे शिक्षण... त्यानंतर संशोधन क्षेत्रातही ठशीव कामगिरी... अवघ्या ४० वर्षाच्या ...

व्यायामाला गेले अन् हृदयविकाराने नेले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभियंत्रिकीचे शिक्षण... त्यानंतर संशोधन क्षेत्रातही ठशीव कामगिरी... अवघ्या ४० वर्षाच्या वयात यशाचे शिखर गाठणारा युवा अभियंता दिवाळीत खास आईच्या भेटीसाठी घरी आला. सकाळी व्यायामासाठी मैदानात गेला अन् त्याचवेळी हृदयविकाराचा झटका येऊन जग सोडून गेला. होतकरू तरुणाच्या अशा करुण मृत्यूने सारे यवतमाळकर हळहळ व्यक्त करीत आहेत.
मनिष वसंतराव गडेकर असे या अभियंत्याचे नाव आहे. येथील प्रसाद कॉलनीतील ते रहिवासी होते. आई सुलोचनाताई यांनी अत्यंत कष्टाने मनिषसह त्याचे मोठे बंधू सतीश व आशीष यांना शिकविले. तिन्ही भाऊ अभियांत्रिकी पदवीधर झाले. त्यातील एक जण अमेरिकेत तर दुसरा मॉरिशसमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. सर्वात लहान मनिष हे नागपूर येथून अभियांत्रिकी शाखेत प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वाची घोडदौड सुरू केली. ते रेफ्रिजरेशन असोसिएशन आॅफ इंडियाच्या नागपूर चाप्टरचे संस्थापक अध्यक्ष होते. तसेच त्यांनी होल्टाज रेफ्रिजरेशन या कंपनीत विदर्भाचे प्रमुख म्हणून काम केले. त्यांनी नुकतीच मॅक्रो नावाची संस्था स्थापन केली. त्यामाध्यमातून रेफ्रिजरेशन अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचे संशोधनात्मक काम सुरू होते. रेफ्रिजरेशन क्षेत्रातील विविध राष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्सच्या यशस्वी आयोजनातही त्यांचा प्रमुख सहभाग राहिला.
सध्या ते नागपूर येथे स्वावलंबी नगरात राहात होते. दिवाळी आईसोबत साजरी करायची म्हणून ते यवतमाळ येथे आले होते. नित्य नियमाप्रमाणे ते सकाळी रनिंगसाठी मैदानात गेले. मात्र रनिंग करता-करता अचानक कोसळले. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत झालेल्या या आघाताने गडेकर कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे. शुक्रवारी येथील पांढरकवडा रोडवरील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी कविता, मुलगा मिन, आई सुलोचनाताई, दोन भाऊ सतीश व आशीष, बहीण जया संजय गवारे असा परिवार आहे.