जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 09:49 IST2025-12-14T09:47:53+5:302025-12-14T09:49:00+5:30
John Cena vs. Gunther, Cena’s Last Match: मॅचच्या निर्णायक क्षणी गुंथरने सीना याला 'स्लीपर होल्ड' मध्ये पकडले आणि त्यांना 'टॅप आऊट' (पराभव मान्य करणे) करावे लागले. गेल्या जवळपास २० वर्षांच्या कारकीर्दीत सीना यांनी 'टॅप आऊट' होण्याची ही पहिलीच वेळ होती.

जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
डब्ल्यूडब्ल्यूई रिंगणातील महान सुपरस्टार आणि १७ वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या जॉन सीना याच्या २३ वर्षांच्या शानदार कारकीर्दीचा अखेर 'शनिवार नाईट्स मेन इव्हेंट'मध्ये अत्यंत भावनात्मक आणि धक्कादायक पद्धतीने समारोप झाला. आपल्या अंतिम सामन्यात सीना याला रिंग जनरल गुंथर कडून पराभव पत्करावा लागला.
हा सामना वॉशिंग्टन डी.सी. येथील कॅपिटल वन अरेनामध्ये खेळला गेला. मॅचच्या निर्णायक क्षणी गुंथरने सीना याला 'स्लीपर होल्ड' मध्ये पकडले आणि त्यांना 'टॅप आऊट' (पराभव मान्य करणे) करावे लागले. गेल्या जवळपास २० वर्षांच्या कारकीर्दीत सीना यांनी 'टॅप आऊट' होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे अरेनामधील चाहते काही क्षण स्तब्ध झाले आणि अनेकांनी डब्ल्यूडब्ल्यूईच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
पराभवानंतर, सीना यांनी रिंगमध्ये आपले प्रसिद्ध 'नेव्हर गिव्ह अप'चे ब्रीदवाक्य पूर्णत्वास नेले. संपूर्ण डब्ल्यूडब्ल्यूई लॉकर रूम, तसेच कर्ट अँगल, मार्क हेन्री, आरव्हीडी यांसारख्या दिग्गजांनी रिंगबाहेर हजेरी लावून सीना यांना निरोप दिला. सीएम पंक आणि कोडी ऱ्होड्स यांनी त्याला चॅम्पियनशिप बेल्ट्स देऊन सन्मानित केले. भावनाविवश झालेल्या सीनाने आपले बूट आणि रिस्टबँड्स रिंगच्या मध्यभागी ठेवून डब्ल्यूडब्ल्यूई विश्वाला अखेरचा 'सॅल्यूट' केला आणि रिंगमधून बाहेर पडला.
It's over.
— WWE (@WWE) December 14, 2025
Gunther taps out John Cena. pic.twitter.com/0O2lTpl3p1
गुंथरने 'लास्ट टाईम इज नाऊ' टूर्नामेंट जिंकून सीना याच्या अंतिम सामन्यासाठी आव्हान देण्याचा मान मिळवला होता. सीना यांच्या पराभवानंतर गुंथरचे महत्त्व आणखी वाढले आहे, तर सीना यांच्या रूपाने डब्ल्यूडब्ल्यूईमधील एक सोनेरी अध्याय संपला आहे.