दूपारनंतर उघडीप; पूर ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 20:57 IST2017-07-29T20:49:32+5:302017-07-29T20:57:42+5:30
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्गही कमी करण्यात आल्याने गोदावरीचा पूर ओसरला.
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी (दि.२९)) जोर धरला होता; मात्र दुपारी बारा वाजेपासून पावसाने उघडीप दिली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्गही कमी करण्यात आल्याने गोदावरीचा पूर ओसरला.रात्रीपासून शहरासह ग्रामिण भागात जोरदार पाऊस सुरू होता. सकाळीदेखील पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे गोदावरीच्या पूराची तीव्रता वाढते की काय, अशी भीती नाशिककरांसह प्रशासनालाही वाटत होती; मात्र दहा वाजेपासून पावसाचा जोर कमी झाला आणि बारावाजेपर्यंत पावसाने उघडीप दिली. दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे गंगापूर धरणातूनही विसर्ग सकाळपासून ‘जैसे-थे’ ठेवण्यात आला होता. गोदावरीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने गोदामाईसोबत ‘सेल्फी’ घेण्यासाठी संध्याकाळी तरुणाईची गोदाकाठावर गर्दी झाली होती. पावसाने उघडीप दिल्यामुळे शहरातील रस्त्यांवर दुपारपासून संध्याकाळपर्यंत नागरिकांची वर्दळ वाढल्याचे चित्र पहावयास मिळाले.

















