जि.प. लघुसिंचन विभाग प्रभा-यांच्या भरवश्यावर
By Admin | Updated: October 10, 2014 00:54 IST2014-10-10T00:42:51+5:302014-10-10T00:54:31+5:30
रिक्त पदाचे ग्रहण कायम : सिंचन विकासात आली आडकाठी.

जि.प. लघुसिंचन विभाग प्रभा-यांच्या भरवश्यावर
वाशिम : जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग आजमितीला प्रभार्यांच्या भरवश्यावर मार्गक्रमण करीत आहे. कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचार्यांकडे वाढलेला कामाचा व्याप पाहता कर्तव्याला न्याय देणे कठीण बनले असून ग्रामविकासाची जननी म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषदेच्या या महत्वपूर्ण विभागाकडे लक्ष देईल का हा खरा प्रश्न आहे.
जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडे 0 ते १00 हेक्टरपर्यंतच्या लघुसिंचन योजनांसह पाझर तलाव, गावतलाव, कोल्हापूरी बंधारे व त्यांच्या दूरुस्तीची कामे, रब्बी कामे, पावसाळ्य़ात प्रभावीत झालेली कॅनॉल दूरुस्तीची कामे, विदर्भ सधन सिंचन योजना आदी कामे प्राधान्याने केली जातात. ग्रामविकासाची जननी असलेल्या जिल्हा परिषदेच्या या महत्वपूर्ण विभागाला मात्र गेल्या कित्येक महिण्यांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पद रिक्त असून त्यानंतर कामाची जबाबदारी असणारे उपकार्यकारी अभियंता पदही रिक्त आहे. उपअभियत्याची एकूण चार पदे आहेत. त्यापैकी दोन पदे रिक्त असून दोन पदावर प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत. शाखा अभियांत्याची एकूण २४ पदे आहेत. त्यापैकी तब्बल १६ पदे रिक्त असून कार्यरत असलेल्या आठ शाखा अभियंत्यांपैकी दोघे निलंबीत व एक शाखा अभीयंता दीर्घ रजेवर असल्याने केवळ पाच शाखा अभियंता कार्यरत आहेत. कार्यरत असलेल्या पाच शाखा अभियंत्यांपैकी दोघांकडे उपअभियंता पदाचा प्रभार आहे. स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यकाची चार पदे असून ही चारही पदे रिक्त आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अधिकारी कर्मचार्यांची पदे रिक्त असल्याने लघूसिंचन विभागांतर्गत कामांचे नियोजन पूरते कोलमडले असून कामाचे नियोजन करावे तरी कसे असा प्रश्न कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचार्यांना पडला आहे.