सापांच्या रक्षणासाठी सरसावली युवा मंडळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:12 IST2017-08-18T01:11:48+5:302017-08-18T01:12:07+5:30
वाशिम: साप हा माणसाचा शत्रू नसून मित्र आहे, ही भावना मनामनात रुजवून नागरिकांच्या मनातील सापांबाबतचे गैरसमज दूर करणे आणि नामशेष होत चाललेल्या तथा दुर्मिळ सापांचे रक्षण करण्यासाठी येथील युवा मंडळी सरसावली आहे. याकामी वन विभागही सर्पमित्रांच्या मदतीला धावला असून, सामूहिक प्रयत्नांमधून गेल्या पाच महिन्यात शंभरपेक्षा अधिक सापांना जीवनदान देण्यात युवकांना यश मिळाले आहे.

सापांच्या रक्षणासाठी सरसावली युवा मंडळी!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: साप हा माणसाचा शत्रू नसून मित्र आहे, ही भावना मनामनात रुजवून नागरिकांच्या मनातील सापांबाबतचे गैरसमज दूर करणे आणि नामशेष होत चाललेल्या तथा दुर्मिळ सापांचे रक्षण करण्यासाठी येथील युवा मंडळी सरसावली आहे. याकामी वन विभागही सर्पमित्रांच्या मदतीला धावला असून, सामूहिक प्रयत्नांमधून गेल्या पाच महिन्यात शंभरपेक्षा अधिक सापांना जीवनदान देण्यात युवकांना यश मिळाले आहे.
वाशिममधील रहिवासी मो. समीर या युवकास साप पकडण्याची कला अवगत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या संपर्कात आलेल्या आकाश रत्ने या युवकाने ही कला शिकून घेत आपल्या मित्रांनाही याकामी प्रोत्साहित केले. त्यामुळे पाहता-पाहता सर्वेश फुलउंबरकर, पवन पाईकराव, गोकुळ ताजणे, रवि राठोड, चंदन रत्ने, महेश इंगळे, पवन पाटील या युवकांनीही इंटरनेटवर सतत अभ्यास करून व योग्य प्रशिक्षण घेऊन सापांना जीवनदान देण्याच्या या मोहिमेत स्वत:ला झोकून दिले.
याबाबत माहिती देताना आकाश रत्ने याने सांगितले, की नागरिकांच्या मनात सापांबद्दल मोठी भीती व अनेक गैरसमज आहेत, ते दूर करण्यासाठी आमचा ग्रुप प्रयत्नशिल आहे. ‘व्हाट्सअँप’, ‘फेसबुक’च्या माध्यमातून याबाबत जनजागृती केली जात असून, प्रत्येकाचा मोबाइल नंबर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे आता वाशिम शहरच नव्हे; तर आसपास कुणाकडेही साप आढळून आल्यास त्याला थेट जीवानिशी न मारता आम्हाला ‘कॉल’ येत आहे. आम्हीदेखील क्षणाचाही विलंब न करता सापाला पकडण्याचे साहित्य सोबत घेऊन ‘रेस्क्यू ऑपरेशन’द्वारे सापाला जिवंत पकडून वन विभागाच्या हवाली करीत आहोत. याकामी वाशिम वनपरिक्षेत्राधिकारी एस.व्ही.नांदुरकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभत आहे. या माध्यमातून गेल्या चार ते पाच महिन्यात शंभरापेक्षा अधिक विषारी, निमविषारी सापांना जीवनदान देण्यात आम्हाला यश मिळाले असून, ती आमच्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे, असे आकाशने सांगितले.
सर्पमित्रांना आढळला ‘फुरसे’ प्रजातीचा साप!
नाग, मण्यार, फुरसे, घोणस, पोवळा, पट्टेरी पोवळा, चापडा हे साप विषारी असून, त्यापैकी फुरसे प्रजातीचा साप वाशिम जिल्ह्यातून बहुतांशी नामशेष झाला होता. दरम्यान, वाशिमच्या सर्पमित्रांना शहरातील साईलिला नगरमध्ये हा साप रविवार, १३ ऑगस्ट रोजी आढळला. त्यास काळजीपूर्वक जेरबंद करून वन विभागाच्या हवाली करण्यात आले.