या रस्त्यासाठी अनेक आंदोलने झाल्यानंतर त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर टेंडर ओपन करण्यासाठी जवळपास दोन महिने लागले. आता टेंडर ओपन झाल्यानंतरही कामाला सुरुवात न झाल्यामुळे व्यापारी वर्गात, नागरिकांत असंतोष खदखदत आहे. हा रस्ता शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला असून, प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांच्या कार्यशैलीवर व प्रामाणिकतेवर प्रश्न उपस्थित करणारा ठरत आहे. या रस्त्यावर पावसाळा सुरू झाला की अक्षरशः पाण्याची डबके साचून चालणे किंवा गाडी चालविणे फार कठीण होते. पाणी साचले तरी, मुरूम टाकण्याचे कामही बांधकाम विभागाकडून केले जात नसल्याची मोठी खंत शहरवासीयांना आहे. कोणताही लोकप्रतिनिधी या रस्त्याचे काम झाले पाहिजे, याविषयी आग्रही भूमिका घ्यायला तयार नाही. शहराच्या मध्यभागी रस्ता असला, तरी तो नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात येत नाही. त्यामुळे स्थानिक नगर परिषद प्रशासन कामाच्यासंदर्भात अंतर ठेवून आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात रस्ता येत असला, तरी त्यांच्याकडे निधीच उपलब्ध होत नाही. काही महिन्यांपूर्वी युवा समाजसेवक अनंत देशमुख यांनी उपोषण केले होते आणि नागरिकांचा त्या उपोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. परंतु तालुक्यातील जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लवकरच काम सुरू करण्याच्या लेखी पत्रानुसार उपोषण मागे घेण्यास भाग पाडले होते. जबाबदार अधिकारी लेखी पत्र देत असल्यामुळे काम सुरू होण्याची शास्वती नागरिकांना वाटत होती; परंतु अनेक महिने लोटले तरी अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासनही राजकीय नेत्याप्रमाणे फसवे निघाल्याने सर्व शहरवासीयांचा भ्रमनिरास झाला. यासंदर्भात संबंधित विभागाशी संपर्क साधला असता, टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, टेंडरही ओपन केल्याचे समजते, मात्र ही सर्व प्रक्रिया गुलदस्त्यात ठेवून सुरू असल्यामुळे सर्वसामान्य व्यापारी, नागरिकांना यासंदर्भात काहीच माहिती मिळत नाही. जर टेंडर ओपन झाले, तर कामास सुरुवात का नाही, असाही प्रश्न या व्यापाऱ्यांना व नागरिकांना पडला आहे. आता पावसाळा येतोय, तरीही काम सुरू होत नाही, हे पाहून बांधकाम विभागाच्या ढिसाळ आणि कर्तव्यशून्य व्यवस्थापनाविषयी प्रचंड चीड सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
...तरीही रस्त्याच्या कामाला सुरुवात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST