श्रमदानातून जलसंधारणाची कामे!
By Admin | Updated: April 19, 2017 01:14 IST2017-04-19T01:14:17+5:302017-04-19T01:14:17+5:30
जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे श्रमदान : कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन दान

श्रमदानातून जलसंधारणाची कामे!
कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील ग्राम जानोरी व जयपूर येथील जलसंधारणाच्या कामात जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रमदान केले.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, संवर्धन संस्थेचे डॉ. नीलेश हेडा व नायब तहसीलदार, महसूल कर्मचारी , मंडळ अधिकारी, तलाठी वर्गाने भेट देऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी जानोरी येथे शेताच्या बांधबंदिस्त कामासाठी श्रमदान केले. जयपूर येथे श्रमदानातून तयार केलेल्या ५०० मीटर सीसीटीच्या कामाची पाहणी व शेततळयाचे भूमिपूजन केले. याप्रसंगी युवा संस्थेचे वसंता इंगळे यांनी श्रमदानातून पुढे येणाऱ्या गावासाठी १०० टिकास, १०० फावडे व १०० टोपले भेट दिले. यापैकी काही साहित्याचे वाटप जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते जयपूर सरपंच विजय काळे यांना भेट दिले. याप्रसंगी जयपूरचे ग्रामसेवक नरेश गजभिये यांनी एक महिन्याचा पगार जलसंधारणाच्या कामी दिला. यासंदर्भातचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जयपूर सरपंचांना दिला. तसेच काकडशिवणी ग्रामसेवक ठोकबर्डे, तांत्रिक अधिकारी सचिन उदरे यांनीसुद्धा एक महिन्याचा पगार जलसंधारणाच्या कामी दिल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तिघांचा सत्कार केला. श्रमदान करत असलेल्या गावकऱ्यांसोबत द्विवेदी यांनी संवाद साधला. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेऊन गावाला पाणीदार करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे.
--