कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन
By Admin | Updated: March 24, 2015 00:37 IST2015-03-24T00:37:35+5:302015-03-24T00:37:35+5:30
मालेगाव पंचायत समितीमध्ये अधिकारी विरुद्ध पदाधिकारी वाद.

कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन
मालेगाव (जि. वाशिम) : मालेगाव पंचायत समितीतील पदाधिकारी व कर्मचारी यांचा वाद अखेर विकोपाला गेला असून मालेगाव पंचायत समितीतील गटविकास अधिकार्यासह इतर विभागाचे अधिकारी यांनी आज (२३ मार्चला)अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय गाठून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. गुडीपाडवा या दिवशी सुटी असताना काही कर्मचारी पेडींग काम करत होते. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक अंभोरे व जि.प.सदस्य चंदू जाधव यांनी सुटीच्या दिवशी कार्यालय का उघडले अशी विचारणा केली. यावरून त्यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाला. या घटनेचे पडसाद सोमवार २३ मार्च रोजी दुपारी १ वाजता गटविकास अधिकारी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी यांनी कार्यालय सोडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली व गुडीपाडव्याच्या दिवशी घडलेली संपूर्ण घटना कथन केली. तसेच पुढील आदेश येईपर्यंंत कामबंद आंदोलन सुरु करणार असल्याचे सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कर्मचारी यांनी एक निवेदन सादर केले त्यामध्ये त्यांनी म्हटले की, मार्च महिन्यातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यालयात काम करत असताना अंभोरे व जाधव येथे आले व सुटीच्या दिवशी कार्यालय का उघडले, अशी विचारणा केली. काही काम नसतांना सर्व कर्मचार्यांना कोंडून घेतले. त्यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीने त्या दिवसाचा वाद निवळला , तसेच वारंवार मस्टरची मागणी करतात व हेतुपुरस्सर त्रास देतात. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही कामबंद आंदोलन करत आहोत, असे नमूद केले आहे. दरम्यान कार्यालयीन कामासाठी आलेल्या लोकांना आल्या पावली परत जावे लागले. त्यामुळे तिथे पंचायत समिती सभापती लबडे, अंभोरे, संजय देशमुख, उद्धवराव राउत, शिल्पा पंकज देशमुख, अन्नपूर्णा भुरकाडे, दिपकराव राउत यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित झाले होते. सदस्य व कर्मचारी यांचा वाद आता पुढे काय वळण घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.