उड्डाण पुलाचे काम रेंगाळले; रेल्वे गेटनजीकची वाहतूक कोंडी कधी मिटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:45 IST2021-09-06T04:45:49+5:302021-09-06T04:45:49+5:30

दादाराव गायकवाड - लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : शहरातील वाशिम-पुसद मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाच्या कामाला नांदेड रेल्वे विभागाचे ...

Work on the flyover lingered; When will the traffic jam near the railway gate end? | उड्डाण पुलाचे काम रेंगाळले; रेल्वे गेटनजीकची वाहतूक कोंडी कधी मिटणार

उड्डाण पुलाचे काम रेंगाळले; रेल्वे गेटनजीकची वाहतूक कोंडी कधी मिटणार

दादाराव गायकवाड - लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : शहरातील वाशिम-पुसद मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाच्या कामाला नांदेड रेल्वे विभागाचे काम रेंगाळत सुरू आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे रेल्वे गेटनजीकची वाहतूक कोंडी मिटणार कधी, असा प्रश्न वाहनचालक करीत आहेत.

वाशिम शहरामधून जाणाऱ्या पुसद मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. ११४ मुळे सतत वाहतूक कोंडी होते. या त्रासामुळे शहरवासीय आणि या मार्गाने येणारे, जाणारे प्रवासी वैतागून गेले आहेत. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी या ठिकाणी उड्डाण पूल बांधणे आवश्यक होते. जिल्हाभरातील जनतेची ही समस्या सोडविण्यासाठी खासदार भावना गवळी यांनी विशेष पुढाकार घेतला आणि केंद्र शासनाकडे सतत पाठपुरावा करून केंद्रीय रस्ते विकास निधीअंतर्गत पुसद रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ११४ व हिंगोली रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ११५ वरील उड्डाण पूल मंजूर करून घेतले. त्यानंतर पुसद रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिमकडून पाच वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली; परंतु या कामाला अपेक्षित गती मिळाली नाही. गेल्या दीड महिन्यांपूर्वी रेल्वेने त्यांच्या अखत्यारीतील कामाला गती दिली आणि रेल्वे लाइनवरील पुलाच्या छताचे काम वेगात सुरू केले; परंतु आता हे काम पुन्हा रेंगाळले आहे.

०००००००००००००००००००००००००००००

रेल्वे रुळालगतच्या स्लॅबचे कामही ठप्प

वाशिम-पुसद मार्गातील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वेकडून त्यांच्या अखत्यारीतील स्लॅबचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. गेल्या चार वर्षांत बांधकाम विभागाकडूनही अत्यंत संथगतीने काम केले जात होते. गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वेने प्रत्यक्ष रेल्वेलाईनवरील गर्डरचे काम सुरू केले; परंतु हे कामच अपूर्ण असल्याने लाइनलगत स्लॅबचे कामही थांबले आहे.

०००००००००००००००००००००

वाहन चालकांची समस्या कायमच

वाशिम-पुसद मार्गावर रेल्वे क्रॉसिंगला उड्डाण पुलाअभावी सध्या वाहतुकीची कोंडी होते. काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला होता. रेल्वेने त्यांची जबाबदारी पूर्ण करण्याची तसदीही घेतली होती; परंतु पुन्हा त्यांचे काम रेंगाळत सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागालाही काम सुरू करता येणार नाही. त्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवरील गेटनजीकच्या वाहतूक कोंडीची समस्या कायमच आहे.

०००००००००००००००००००००००००

कोट: रेल्वे उड्डाण पुलाचे रेल्वे विभागाच्या अखत्यारीतील काम वेगात सुरू आहे. आम्हीसुद्धा आमच्या अखत्यारीतील काम पूर्ण करण्याबाबत एजन्सीला सूचना दिल्या आहेत. रेल्वेलाइनलगतचे स्लॅब रेल्वेकडून पूर्ण होताच आमचे कामही सुरू करून तातडीने पूर्णही करून घेऊ.

- अजय बोरकर,

उपकार्यकारी अभियंता,

सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम

Web Title: Work on the flyover lingered; When will the traffic jam near the railway gate end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.