महिलांच्या बोटांचे ठसे उमटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:27 IST2017-09-04T01:27:13+5:302017-09-04T01:27:26+5:30

वाशिम : शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करण्यात अनेक अडचणी येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. आधीच सर्व्हर डाउन, नेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या असताना, आता अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीचे ठसेच थम्ब मशीनवर उमटत नसल्याने शेतकरी अर्ज सादर करण्यापासून वंचित राहत असल्याचे चित्र मंगरुळपीर तालुक्यात पाहायला मिळत आहे.

Women's fingerprints! | महिलांच्या बोटांचे ठसे उमटेना!

महिलांच्या बोटांचे ठसे उमटेना!

ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील चित्र ऑनलाइन अर्जापासून शेतकरी राहताहेत वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करण्यात अनेक अडचणी येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. आधीच सर्व्हर डाउन, नेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या असताना, आता अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीचे ठसेच थम्ब मशीनवर उमटत नसल्याने शेतकरी अर्ज सादर करण्यापासून वंचित राहत असल्याचे चित्र मंगरुळपीर तालुक्यात पाहायला मिळत आहे.
 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांच्या नाकीनऊ येत आहेत. शेतकरी घरी लहान मुलांना सोडून, पत्नीसोबत सेतू केंद्रांवर ताटकळत बसत आहेत. या ठिकाणी नेट कनेक्टिव्हिटी आणि सर्व्हर डाउनची समस्या असल्याने त्यांना दिवसरात्र मुक्काम करावा लागत असून, शेतातील कामे सोडून  सतत अर्जासाठी सेतू केंद्रांच्या वार्‍या कराव्या लागत आहेत.  आता त्यात वेगळीच समस्या उद्भवली असून, अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीचे ठसेच थम्ब मशीनवर उमटत नसल्याचे प्रकार घडत आहेत. मंगरुळपीर येथील गवळीपुरा परिसरातील तीन महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. सेतू केंद्रावर या महिला अर्ज सादर करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या बोटाचे ठसे घेण्याचा प्रयत्न सेतू केंद्र संचालकाने केला; परंतु मशीनवर बोटांचे ठसेच उमटत नसल्याचे दिसले. वारंवार प्रयत्न करूनही त्याला यश आले नाही. अखेर या महिलांना निराश होऊन घरी परतावे लागले. असाच प्रकार रविवारी मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथेही पाहायला मिळाला. जवळपास आठ ते दहा शेतकरी महिलांना या समस्येचा सामना करावा लागला.  ग्रामपंचायतमधील संगणक परिचालकाने या महिलांच्या बोटाचे ठसे अदलून बदलून तपासून पाहिले; परंतु काहीच फायदा झाला नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी एकाही पुरुषाच्या बोटाचे ठसे न उमटल्याचा प्रकार घडला नाही. सतत काम केल्याने बोटाच्या रेषा मिटल्याने असे होत नाही ना, अशी शंका या महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती कायम राहिल्यास संबंधित शेतकरी कुटुंब कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जापासून आणि पर्यायाने कर्जमाफीपासूनही वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणी शासनाने दखल घेणे आवश्यक आहे. 

Web Title: Women's fingerprints!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.