रानडुकराच्या हल्ल्यात महिला जखमी
By Admin | Updated: June 11, 2016 03:01 IST2016-06-11T03:01:40+5:302016-06-11T03:01:40+5:30
मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथील घटना.

रानडुकराच्या हल्ल्यात महिला जखमी
राजूरा (जि. वाशिम): मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथील नंदाबाई बबन इंगळे ही महिला रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना १0 जून रोजी १२ वाजता दरम्यान सुकांडा शेतशिवारात घडली. जखमीवर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहे. नंदाबाई इंगळे या शेतमजुरीचे कामासाठी इतर महिलांसमवेत गावातील भीमराव अवचार यांचे शेतात गेली होती. १२ वाजता दरम्यान नंदाबाई कामात व्यस्त असताना अचानकपणे रानडुकराने हल्ला केला. यामध्ये तिच्या डाव्या बाजूच्या मांडीला जबर दुखापत झाली. नंदाबाईला उपचारासाठी मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथून वाशिम येथे संदर्भीत करण्यात आले. तेथून नंदाबाईला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. नंदाबाई यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. सुकांडा परिसराचा बहुतांश भूभाग घनदाट जंगल व नदी-नाल्यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या भागात नेहमीच रानडुकरासह इतरही प्राण्याचा मोठा वावर दिसून येतो. त्यातही परिसरात पाण्याची भीषण टंचाई असल्याने पशुपक्ष्यांसह वन्य प्राण्यांची पाण्यासाठी रानोमाळ भटकंती होताना दिसत आहे. गत महिन्याभरापूर्वी सुकांडा येथील एका व्यक्तीचा रानडुकराच्या हल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती.