राष्ट्रविकासात महिलांचे योगदान मोलाचे!
By Admin | Updated: March 9, 2017 02:04 IST2017-03-09T02:04:26+5:302017-03-09T02:04:26+5:30
जिल्हाधिकारी द्विवेदी यांचे प्रतिपादन; अधिकारांचा सक्षमपणे वापर करण्याचे आवाहन.

राष्ट्रविकासात महिलांचे योगदान मोलाचे!
वाशिम, दि. ८- देशाला सार्मथ्यशाली बनविण्यामध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या कार्यकर्तृत्वाने राष्ट्राचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे संविधानाने महिलांना दिलेल्या अधिकारांचा व हक्कांचा महिलांनी सक्षमपणे वापर करावा, स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त बुधवार, ८ मार्च रोजी आयोजित विशेष मतदार नोंदणी कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, उपविभागीय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, तहसीलदार बळवंत अरखराव, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी पुढे म्हणाले, की जनगणनेनुसार आकडेवारीचा विचार केला तर अद्याप अनेक महिलांची मतदार नोंदणी झालेली नाही. त्यामुळे अशा महिलांची मतदार नोंदणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जागतिक महिला दिनानिमित्त विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे.
अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, भारतीय संविधानाने पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांनाही १९५0 मध्येच मतदानाचा अधिकार बहाल केला.
राजकीय क्षेत्रातही महिलांना ५0 टक्के आरक्षण दिले. मिळालेल्या अधिकारांचा सक्षमपणे वापर केल्यास सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात महिला चांगली कामगिरी करू शकतात, असे जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले.