दारूबंदीसाठी शेंदोण्यातील महिलांनी कसली कंबर
By Admin | Updated: October 19, 2014 00:26 IST2014-10-19T00:26:12+5:302014-10-19T00:26:12+5:30
अवैध दारू केली पोलिसांच्या स्वाधीन.

दारूबंदीसाठी शेंदोण्यातील महिलांनी कसली कंबर
मानोरा(वाशिम): तालुक्यातील मौजे शेंदोणा येथील महिला मंडळाने गावात होणारी दारूविक्री बंद करण्यासाठी कंबर कसली असून, याच प्रयत्नांतर्गत त्यांनी दारूची अवैध विक्री करणार्या व्यक्तीला रंगेहाथ पकडून त्याच्याकडील दारू पोलिसांच्या हवाली करीत त्या व्यक्तिविरूद्ध कार्यवाहीची एकमुखी मागणी केली. गावात दारूबंदी असताना १७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास एमएच ३७ जी-२३0५ या क्रमांकाच्या ऑटोरिक्षात अवैध देशी दारू आणून खुलेआम दारू विक्री करीत असल्याचे महिला मंडळाच्या निदर्शनास आले. महिला मंडळाच्या काही सदस्यांनी महिनाभरापूर्वीही सदर व्यक्तीला दारूविक्री थांबविण्याची विनंती केली होती. तरीही तो दिवसाढवळ्या देशी दरू विक्री करीत असल्याचे दिसल्याने पोलिस पाटलासमोर पंचमंडळी जमा करून या व्यक्तीकडील दारू ताब्यात घेतली. ही अवैध दारू मानोरा पोलीस स्टेशनमध्ये आणून सदर व्यक्तीविरुद्ध कडक कारवाईची मागणी करणारे निवेदन ठाणेदारांना महिला मंडळाकडून देण्यात आले.