दादाराव गायकवाड - लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम जिल्ह्यात जुलै २०२१ च्या मध्यंतरी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यात पीकविमाधारक शेतकऱ्यांचाही समावेश होता. त्यापैकी ९०१४ शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत विमा भरपाईसाठी अर्ज केले. तथापि, पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्वेक्षण विलंबाने पूर्ण केले. दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाची उलंगवाडी झाल्यावर विमा भरपाई देणार का, असा सवाल शेतकरी करीत आहेत.
वाशिम जिल्ह्यात ३० जुलै २०२१ च्या अहवालानुसार २ लाख २९ हजार ५९२ शेतकऱ्यांनी १ लाख ७७ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रातील पिकांना विमा कवच दिले. यासाठी त्यांनी ७५७ कोटी ८८ लाख रुपयांचा विमा हप्ताही भरला. जुलैच्या मध्यंतरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिकांसह जमीन खरडून गेली. यात पीक विमाधारक शेतकऱ्यांचाही समावेश होता. त्यापैकी ९ हजार १४ शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या भरपाईसाठी निर्धारित मुदतीत अर्ज केले. तथापि, सर्वेक्षणाला विलंब लागल्याने प्रत्यक्ष अहवाल तयार होऊन शासनाकडून मदत मंजूर होण्यास अधिकच वेळ लागणार आहे. त्यामुळेच शेतकरी हताश झाले असून, रब्बी हंगामाची उलंगवाडी झाल्यानंतर विमा भरपाई देणार का, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
०००००००००
पीक विमा काढलेले एकूण शेतकरी - २,४२,८०४
विमा कवच दिलेले क्षेत्र (हेक्टर)- १, ८७,७५८
जुलैमध्ये नुकसान झालेले शेतकरी- ९०१४,
०००००००००००००००००००००००००००
दावा करणारे तालुकानिहाय शेतकरी (जुलै २०२१)
तालुका - शेतकरी
मंगरुळपीर - ४७८३
मानोरा - २८८७
वाशिम - १०७५
रिसोड - १३३
कारंजा - ८६
मालेगाव - ५०
००००००००००००००००००००००००
ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही ३२४५ शेतकऱ्यांचे नुकसान
जिल्ह्यात जुलैमधील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या ९०१४ शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मंजूर झालाच नसताना ऑगस्टच्या अखेर आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला अतिवृष्टीमुळे आणखी ३२४५ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यापैकी २१४२ शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, ११०३ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण बाकी आहे.
००००००००००००००