वाशिम जिल्ह्यातील सर्व विद्युत उपकेंद्रांची क्षमता वाढविणार - बावनकुळे
By Admin | Updated: May 18, 2017 19:43 IST2017-05-18T19:43:01+5:302017-05-18T19:43:01+5:30
वाशिम : पुरेसा दाबाने वीज पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या सर्व उपकेंद्राची क्षमता ५ एम.व्ही.ए. वरून १० एम.व्ही.ए. करण्यात येणार आहे.

वाशिम जिल्ह्यातील सर्व विद्युत उपकेंद्रांची क्षमता वाढविणार - बावनकुळे
ऑनलाइन लोकमत
वाशिम : जिल्ह्यातील अनेक ३३/११ के.व्ही.ची उपकेंद्रे अतिभारीत झाल्यामुळे वीज जोडण्या प्रलंबित आहेत. तसेच पुरेसा दाबाने वीज पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या सर्व उपकेंद्राची क्षमता ५ एम.व्ही.ए. वरून १० एम.व्ही.ए. करण्यात येणार आहे. याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात बेलमंडल (ता. कारंजा), आसेगाव पेन (ता. रिसोड) व कुपटा (ता. मानोरा) येथील ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, माजी आमदार विजयराव जाधव, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंते विनोद बेथारीया, अनिल डोये, राकेश जनबंधू आदी उपस्थित होते.
ना. बावनकुळे म्हणाले की, वाशिम जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा सक्षमीकरणासाठी १५० कोटी रुपये निधी देण्यात आला असून या निधीतील सर्व कामे पुढील दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आज दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतील तीन उपकेंद्राचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. इन्फ्रा-२ अंतर्गत मंजूर असलेल्या रिसोड तालुक्यातील कुऱ्हा, मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही या उपकेंद्रांचेही काम लवकरच सुरु होणार आहे. तसेच झोडगा उपकेंद्राचे काम जूनअखेर पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित वीज जोडण्या, भारनियमनाची समस्या बहुतांशी प्रमाणात निकाली निघणार आहे. विजेचा भार कमी करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ऊर्जा बचत करणारे विद्युत पंप वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. जुन्या कृषीपंपधारकांना ऊर्जा बचत करणारे पंप घेण्यासाठी महावितरण ५० टक्के अनुदान देईल, असे ऊर्जामंत्री यावेळी म्हणाले.