पत्नी व मुलाची झोपेतच निर्घृण हत्या!
By Admin | Updated: October 24, 2014 23:26 IST2014-10-24T23:25:32+5:302014-10-24T23:26:15+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला थरार ; आरोपी गजाआड.

पत्नी व मुलाची झोपेतच निर्घृण हत्या!
सोनाळा : गाढ झोपेत असलेल्या पत्नी व मुलावर कुर्हाडीने वार करुन त्यांची हत्या केल्याची दुर्दैवी घटना ऐन दिवाळीच्या आधीच्या रात्री येथे घडली. सुदैवाने त्यावेळी आरोपीची इतर दोन मुले घरी नसल्याने ती बचावली. आरोपीने स्वत:च पोलिसांकडे घटनेची कबुली दिली असून, त्याला ईश्वरानेच पत्नी व मुलास मारण्यास सांगितले होते, अशी बतावणी त्याने केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
येथील इमलीपुर्यात राहणारा नूर महंमद शेख हबीब (वय २९) हा गवंडी म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. त्याचे लग्न २00५ मध्ये सादिकाबी (वय २६) हिच्यासोबत झाले होते. त्यांना मोहम्मद हासीर (वय ४), मुदस्सीर (वय ३) व मुलगी साजीया (वय ६) अशी तीन अपत्ये होती. दिवाळीच्या आधीच्या, म्हणजे २२ ऑक्टोबरच्या रात्री, सादिकाबी व मुलगा मुदस्सीर झोपेत असतानाच, नूर महमंदने प्रथम मुदस्सीरच्या डोक्यात घरातील कुर्हाडीने वार केले.
त्यानंतर त्याने सादिकाबीच्या मानेवर कुर्हाडीने वार करुन तिलाही झोपेतच ठार केले. दुसर्या दिवशी सकाळी त्याने स्वत:च पोलिस पाटील रवींद्र वानखडे यांच्या घरी जाऊन, त्यांना घटनेची माहितीे दिली. वानखडे यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी आरोपी नूर महंमदला अटक केली. त्यावेळी त्याला ईश्वरानेच हे निर्घृण कृत्य करण्यास सांगितल्याची बतावणी त्याने केली.
*दोन मुले बचावली
सुदैवाने घटनेच्या वेळी नूर महंमदची मुलगी साजीया व दुसरा मुलगा महमंद हाशीर ही दोघेही घरी नव्हती. ती त्यावेळी घरी नसण्याचे कारण, तसेच हत्याकांडामागचा आरोपीचा उद्देश, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.