प्राथमिक शिक्षकांचेच वेतन उशिरा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:39 IST2021-05-16T04:39:54+5:302021-05-16T04:39:54+5:30
वाशिम : दरमहा १ तारखेला शिक्षकांचे वेतन देण्याचे आदेश असतानाही, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना वेळेवर वेतन मिळत नाही. मार्च ...

प्राथमिक शिक्षकांचेच वेतन उशिरा का?
वाशिम : दरमहा १ तारखेला शिक्षकांचे वेतन देण्याचे आदेश असतानाही, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना वेळेवर वेतन मिळत नाही. मार्च एन्डिंगमुळे मागील दोन महिन्यांचे वेतन थकले होेते. दोन महिन्यांचे वेतन जरी नुकतचे झाले असले तरी दरमहा पहिल्या आठवड्यात वेतन व्हावे, असा सूर शिक्षकांमधून उमटत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा फटका शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये राज्यात सर्वात मोठी संख्या ही शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांची आहे. या कर्मचाºयांच्या वेतनावर राज्य शासनाचा सर्वात जास्त महसूल खर्च होतो. सध्या कोरोनामुळे राज्य सरकारने अनेक योजनांवर मर्यादा आणल्या आहेत. अनावश्यक खर्चाला परवानगी नाकारली आहे. कार्यालयीन खर्चातही काटकसर करण्याचे निर्देश दिले आहे. असे असले तरी शासकीय, निमशासकीय कर्मचाºयांचे वेतन मात्र नियमित होत आहे. त्या तुलनेत शिक्षकांचे वेतन हे अनियमित असल्याने या प्रश्नाकडे शिक्षक संघटनांनी आवाज उठवित जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दरमहा १ तारखेला वेतन होत नसल्याचा प्रकार आताही घडत आहे. फेब्रुवारी व मार्च अशा दोन महिन्याचे वेतन एप्रिलच्या मध्यापर्यंतही मिळाले नव्हते. वारंवार मागणी केल्याने फेब्रुवारी व मार्च अशा दोन महिन्याचे वेतन मे महिन्यात शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात आले. पूर्वी शासन हे माध्यमिक शिक्षकांच्या वेतनाचे अनुदान तीन ते चार महिन्याचे एकाच वेळी देत होते. आता मात्र वेतन अनुदान एकाच महिन्याचे दिले जाते. त्यातही प्रशासकीय दिरंगाईमुळे माध्यमिक शिक्षकांनादेखील दरमहा १ तारखेला वेतन मिळत नाही. प्राथमिक शिक्षकांना तर महिन्याच्या १०, १५ तारखेपर्यंतही वेतन मिळत नाही. शिक्षकांचेच वेतन उशिराने का? असा प्रश्न शिक्षक संघटनांमधून उपस्थित केला जात आहे.
०००००
१ तारखेला कधीच वेतन होत नाही!
शिक्षकांचे वेतन १ तारखेला मिळायला हवे, असे शासनाचे आदेश आहेत. पण १ तारखेला कधीच वेतन होत नाही. शासनाने वेतन अनुदान दिल्यानंतर बीईओंकडून शिक्षकांचे वेतन बिल शिक्षण विभागात पाठविले जाते. त्यानंतर शिक्षण विभागातील कर्मचारी सर्व बिल गोळा करून कॅफोकडे पाठवितो. बीईओंकडून वेळेवर बिल येत नसल्याने पगार बिल कॅफोकडे पाठविण्यासाठी उशीर होतो. कॅफोकडे पगार बिल गेल्यानंतर गतीने प्रक्रिया होत नाही. त्यामुळे १ तारखेचा पगार १५ ते २० तारखेला होतो.
००
- दृष्टिक्षेपात
शाळा - ७७९
शिक्षक - ३१५०
००००००
शिक्षक संघटनांचा पाठपुरावा !
शिक्षकांचे वेतन हे पहिल्या आठवड्यात होत नसल्याने याकडे शिक्षण विभाग, मुख्य लेखा व वित्त विभागासह मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी शिक्षक संघटनांनी वेळोवेळी निवेदने दिली तसेच पाठपुरावादेखील केला. त्यामुळे महिन्याच्या १० तारखेपर्यंत वेतन होत असे. पाठपुरावा केला नाही तर महिन्याच्या १५ २० तारखेदरम्यान वेतन होते.
००००
घराचे हप्ते, दैनंदिन गरजा कशा भागविणार?
कोट
जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचे वेतन हे दरमहा १ तारखेला देण्यात यावे, असे स्पष्ट आदेश आहेत. मात्र, त्याऊपरही शिक्षकांचे वेतन दरमहा पहिल्या आठवड्यात होत नाही. वेतन दरमहा किमान पहिल्या आठवड्यात करावे, यासाठी पाठपुरावा केला जातो. वेतन नियमित झाले नाही तर गृहकर्जाचे हप्ते यासह अन्य दैनंदिन गरजा कशा भागवाव्या? असा प्रश्न असतो.
- सतीश सांगळे, शिक्षक.
००००
अनेक शिक्षकांनी राष्ट्रीय बँका, शिक्षक पतसंस्थेतून गृह, वाहन, शैक्षणिक, वैयक्तिक कर्ज घेतले आहे. एक महिना पगार उशिरा झाला तर कर्जाचे हप्ते थकीत होतात. अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड आणि पेनॉल्टीही बसत आहे. कोरोना संक्रमण काळात काही शिक्षकांना संसर्ग झाल्याने आणि वेळेवर वेतन नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.
- हेमंत तायडे, शिक्षक
०००००
शिक्षकांचे वेतन हे दरमहा पहिल्या आठवड्यातच झाले पाहिजेत, यासाठी अशी आमची नेहमीच मागणी असते. परंतू, १५ तारखेनंतरच वेतन होतात. त्यामुळे कर्जाचे हप्ते व अन्य खर्च कसा भागवावा, याचा पेच शिक्षकांसमोर असतो. वेळप्रसंगी कर्ज काढून महत्वाची कामे पूर्ण करावी लागतात.
- संतोष शिकारे, शिक्षक