थांबताे का रे आता... की साेयाबीनही नेताे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST2021-09-26T04:44:38+5:302021-09-26T04:44:38+5:30

वाशिम : सोयाबीन कापणीचा हंगाम ऐन तोंडावर आला असताना पाऊस न थांबता सतत कोसळतच आहे. पाऊस ...

Why are you waiting now ... that Saayabeen is also a leader! | थांबताे का रे आता... की साेयाबीनही नेताे!

थांबताे का रे आता... की साेयाबीनही नेताे!

वाशिम : सोयाबीन कापणीचा हंगाम ऐन तोंडावर आला असताना पाऊस न थांबता सतत कोसळतच आहे. पाऊस न थांबल्यास सोयाबीनची कापणी कशी करावी, हे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे असून, अतिपावसाने खरिपाचा हंगाम धोक्यात आल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. ‘थांबताे का रे आता... की साेयाबीनही नेताे’ असे आकाशाकडे पाहून शेतकरी म्हणताना दिसून येत आहेत.

परिसरात यावर्षी मृग नक्षत्रातच पावसाचे दमदार आगमन झाले. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी महागड्या सोयाबीनसह तूर, कपाशी पिकांची पेरणी केली. या पेरणीदरम्यान वेळोवेळी आलेला पाऊस पिकांकरिता पोषक ठरल्याने सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिके दमदार अवस्थेत होती. काही दिवसांतच सोयाबीन कापून घरात येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. अशातच सप्टेंबर महिन्यात दमदार पावसाने सुरूवात करत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने मागील महिन्याची तूट पावसाने भरून काढली. परंतु, या काळात पाऊस थांबला नसल्याने पाण्याच्या निचऱ्याअभावी शेतामध्ये पाणी साचत आहे.

सततच्या पावसाने शेतातील सोयाबीन पीक खराब होण्याच्या मार्गावर असून, तुरीचे पीक पिवळे तर कपाशीची परिस्थिती फारच वाईट झाली आहे. सततच्या पावसाने हिरवी कपाशीची बोंडे सडून शेतात त्यांचा सडा जिकडे-तिकडे पाहायला मिळत आहे. ही सर्व भयावह परिस्थिती शेतकरी पाहात असताना हाताशी आलेला खरीप हंगाम हातचा तर जाणार नाही ना? ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

शंभर दिवस पूर्ण झालेले सोयाबीनचे पीक आता कापणीला आले आहे. या काळात सोयाबीनची कापणी तथा मळणी करेपर्यंत पाऊस थांबणे गरजेचे असताना जोरदार पाऊस सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

-----

Web Title: Why are you waiting now ... that Saayabeen is also a leader!