वितुष्टाच्या राजकारणात कुणाचा होणार गेम?
By Admin | Updated: May 4, 2015 01:10 IST2015-05-04T01:10:59+5:302015-05-04T01:10:59+5:30
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.

वितुष्टाच्या राजकारणात कुणाचा होणार गेम?
वाशिम : ५ मे रोजी मतदान होणार्या दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला अस्तित्वाच्या लढाईची किनार लाभल्याने निवडणूक रंगतदार अवस्थेत पोचली आहे. दिग्गज नेत्यांमधील कुरघोडीचे राजकारण कुणाच्या पदरात विजयाची माळ घालते आणि कुणाचा गेम करते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. अकोला जिल्हय़ातून विभाजन झाल्यानंतर १ जुलै १९९८ रोजी महाराष्ट्राच्या नकाशावर स्वतंत्र जिल्हा म्हणून वाशिमचे नाव कोरले गेले. जिल्हा स्वतंत्र झाला. तथापि, १६ वर्षांंच्या दीर्घ कालावधीतही वाशिम जिल्हय़ासाठी स्वतंत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होऊ शकली नाही, ही शोकांतिका आहे. अकोला व वाशिम हे दोन जिल्हे मिळून मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढविली जाते. वाशिम जिल्हय़ातील सहा तालुके मिळून तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून सहा संचालक निवडून द्यावयाचे आहेत. रिसोड व मंगरुळपीर मतदारसंघातून अनुक्रमे आमदार अमित झनक आणि माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे अविरोध झाल्याने आता चार जागेसाठी निवडणूक रंगली आहे. जिल्हय़ातील ३५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यापैकी २३ जणांनी माघार घेतल्याने आणि दोन जागा अविरोध झाल्याने आता नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात लढत देत आहेत. मालेगाव, वाशिम, कारंजा व मानोरा तालुका सेवा सहकारी सोसायटी म तदारसंघात निवडणूक रंगली आहे.