गर्भपातासाठी औषध खरेदी झाली कोठून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:47 IST2021-08-21T04:47:12+5:302021-08-21T04:47:12+5:30
गर्भधारणापूर्व तसेच प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान, अवैध गर्भपात करणे पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा आहे. जिल्ह्यात असे प्रकार घडत असल्यास याबाबतची माहिती ...

गर्भपातासाठी औषध खरेदी झाली कोठून?
गर्भधारणापूर्व तसेच प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान, अवैध गर्भपात करणे पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा आहे. जिल्ह्यात असे प्रकार घडत असल्यास याबाबतची माहिती नागरिकांकडून गोपनीय स्वरुपात मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांच्या सूचनेवरून जिल्हास्तरावर ८४५९८१४०६० हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला. दरम्यान, हेल्पलाईन क्रमांकावर प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या चमूने १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी डॉ. शशिकांत सारसकर यांच्या दवाखान्यावर अचानक धाड टाकली. त्याठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील ४० वर्षीय महिला गर्भपाताकरिता भरती असल्याचे व तिच्यावर गर्भपाताकरिता उपचार करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
चौकशीमध्ये महिलेच्या गर्भपातासाठी बोगस डॉक्टर विलास ठाकरे याने उपचार केल्याचे सांगण्यात आले. दवाखान्याची झडती घेत असता बोगस डॉक्टर विलास ठाकरे याच्याकडे गर्भपातासाठी आवश्यक असणारी औषधे आढळून आली. शहर पोलिसांनी दाखल तक्रारीवरून दोन्ही आरोपींना अटक केली. बोगस डॉक्टर विलास ठाकरे याने गर्भपातासाठी औषधी स्थानिक मेडिकलवरून खरेदी केली किंवा ऑनलाईन मागविली, याचा शोध घेण्यासाठी औषध प्रशासन विभागाकडे हे प्रकरण सुपूर्द करण्यात आले असून सखोल तपासणी सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.