१२, २४ वर्षे सेवा दिलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी प्रशिक्षण केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST2021-09-10T04:49:20+5:302021-09-10T04:49:20+5:30
वाशिम : जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत जवळपास ५०० शिक्षकांना १२ व २४ वर्षे सेवा दिल्यानंतरही, केवळ प्रशिक्षण नाही म्हणून वरिष्ठ ...

१२, २४ वर्षे सेवा दिलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी प्रशिक्षण केव्हा?
वाशिम : जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत जवळपास ५०० शिक्षकांना १२ व २४ वर्षे सेवा दिल्यानंतरही, केवळ प्रशिक्षण नाही म्हणून वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ मिळालेला नाही. २० जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षण घेण्याचे आदेश असूनही जिल्ह्यात प्रशिक्षणच घेण्यात आले नसल्याने याविरोधात कास्ट्राईब शिक्षक संघटनेने आवाज उठवीत प्रशिक्षण घेण्याची मागणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिमच्या (डाएट) प्राचार्यांकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली.
शिक्षक म्हणून १२ वर्षे सेवा दिल्यानंतर वरिष्ठ श्रेणी आणि २४ वर्षे सेवा दिल्यानंतर निवड श्रेणीचा लाभ मिळणे बंधनकारक आहे. तत्पूर्वी, संबंधित शिक्षकांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. सेवेची १२ व १४ वर्षे पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना तातडीने प्रशिक्षण मिळावे याकरिता शालेय शिक्षण विभागाने २० जुलै २०२१ रोजी शासन निर्णय पारित करून संबंधितांना निर्देशही दिले आहेत. मात्र, वाशिम जिल्ह्यात अद्यापही प्रशिक्षण घेण्यात आले नाही. यामुळे जवळपास ५०० शिक्षक हे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीपासून वंचित आहेत. यासंदर्भात कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा वाशिमच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वाशिमला निवेदनही दिले. वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. अमोल डोंबारी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव वैद्य, कार्याध्यक्ष संतोष पट्टेबहादूर, विनोद मनवर, मिलिंद अंभोरे, प्रभू मोरे, गणपतराव लोखंडे, प्रकाश कांबळे, सुभाष सरतापे, अरविंद घुगे, तुकाराम इंगळे, रतन पट्टेबहादूर, विजय अघम, विजय पट्टेबहादूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
००००००
जिपचे एकूण शिक्षक : ३२००
प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असलेले : ५००
०००००
निर्देश प्राप्त होताच प्रशिक्षण
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिमचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. अमोल डोंबारी, अधिव्याख्याता डॉ. अरुण सांगोलकर विषयतज्ज्ञ मोरे, भारत लादे व विश्वंभर आळणे यांच्याशी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली असता, संचालक, पुणे यांच्याकडून निर्देश प्राप्त होताच तात्काळ प्रशिक्षणाचे आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
०००
...तर आंदोलनाचा इशारा
१२ व २४ वर्षे सेवा दिल्यानंतरही वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ मिळण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन होणार नसेल, तर न्यायोचित मागणीसाठी यापुढे आंदोलन छेडण्यात येइल, असा इशारा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव वैद्य व पदाधिकाऱ्यांनी दिला.