कानांचं सोडा, हृदय-फुप्फुसाचं काय?
By Admin | Updated: October 22, 2014 00:34 IST2014-10-22T00:28:41+5:302014-10-22T00:34:31+5:30
फटाक्यांचा अट्टाहास येऊ शकतो अंगलट : फटाक्यातील रासायनिक पदार्थाचा मानवी शरिरावर परिणाम.

कानांचं सोडा, हृदय-फुप्फुसाचं काय?
वाशिम : फटाक्यांचा आवाज कर्णबधिरता आणू शकते, याची पूर्वकल्पना साधारणत: सर्वांनाच आहे. मात्र, फटाक्यांमधील रासायनिक पदार्थ शरिराच्या अनेक घटकांवर घातक परिणाम करीत असल्यावर अनेकजण अनभिज्ञ असतात. आवाजापेक्षा रासायनिक पदार्थांचा हृदय व फुप्फुसावरील दुरगामी परिणामाचे भान ठेवूनच दिवाळीत फटाक्यांचे बार उडविणे काळाची गरज ठरत आहे.
दिवाळीत फटाक्यांचे बार उडविण्यासाठी परीक्षा आटोपताच बच्चे कंपनीने नियोजन केले आहे. मात्र, दूरगामी परिणाम लक्षात घेता सावधानता बाळगूनच फटाक्यांचा आनंद घेणे गरजेचे ठरत आहे. ध्वनिप्रदुषण कमी करण्यासाठी पर्यावरणपुरक फटाक्यांची विक्री तेजीत आहे. पर्यावरणापूरक दावा करणारे यातील अनेक फटाके आवाजापेक्षाही घातक रासायनिक पदार्थाचा उत्सर्ग करीत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या चायना मेड फटाक्यांमुळे कानांपेक्षा किडनी, डोळे, ह्रदय, फुप्फुस यांचीच काळजी अधिक घ्यावी लागणार आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेनुसार दिवाळी काळातील पाच वेळेतील आवाजाची तीव्रता अधिक असते. सरासरी ३0 ते ४0 डेसिबलहून अधिक प्रमाणात ध्वनिप्रदुषण होत असते. सध्या ध्वनिप्रदुषण टाळणारे कमी आवाजाचे अनेक फटाके बाजारात दाखल झाले आहेत. आकर्षक पॉकिंगसह पर्यावरण पुरकतेचा दावा करणार्या या फटाक्यांची मागणीही वाढत आहे. कर्णमधुर आवाजाबरोबरच हिरवा, सोनेरी व गुलाबी रंगाची बरसात करणारे हे फटाके अनेक विषारी रासायनिक पदार्थ वातावरणात सोडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या फटाक्यांत जस्त, तांबे, लोखंड, अँल्युमिनियम आदींचा वापर केला जातो. अशा धातुंच्या संयोगाने सल्फरडाय ऑक्साईड, पोटॅशियम नायट्रेट, बेरियमसाररखे शरीरावर अत्यंत दुरगामी परिणाम करणारे घटक उत्सर्जित होतात. त्यामुळे डोळयांचा विकार, झोप न लागणे, ह्रदय जोरात धडधडणे, रक्तदाब, मळमळणे, लिव्हरचा त्रास, किडनी व फुप्फुसाचे आजार उदभु शकतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले.