संध्याकाळच्या दुधाचे काय करावे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:40 IST2021-04-25T04:40:00+5:302021-04-25T04:40:00+5:30
मालेगाव : सायंकाळच्या वेळेस दूध डेअरीवर होत असलेले दूध संकलन बंद करण्याचे आदेशाच्या विरोधात २२ एप्रिल रोजी शहरातील ...

संध्याकाळच्या दुधाचे काय करावे?
मालेगाव : सायंकाळच्या वेळेस दूध डेअरीवर होत असलेले दूध संकलन बंद करण्याचे आदेशाच्या विरोधात २२ एप्रिल रोजी शहरातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूध डेरी संघटनेच्या वतीने मालेगाव तहसीलदार रवी काळे यांना निवेदन देऊन अन्यायकारक आदेश तत्काळ मागे घेण्याची मागणी केली.
मालेगाव दूध डेअरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, सकाळी ७ ते ११ ही दूध संकलन करण्याची वेळ दिली असून, सायंकाळची वेळ बंद केल्याने शेतकरी दूध उत्पादक व दूध डेअरी संकलन करणारे अडचणीत आले आहेत. अगोदरच हॉटेल, टी सेंटर बंद असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध डेअरीचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच २१ एप्रिलपासून जिल्हाधिकारी वाशीम यांनी सायंकाळचे दूध संकलन केंद्र बंद केल्याने सायंकाळच्या दुधाचे काय करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. बुलडाणा व अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी दोन ते तीन तासांचा वेळ दिला आहे. त्याप्रमाणे, वाशीम जिल्ह्यात सायंकाळी ६ ते ८ अशी दोन तास दूध संकलन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी दूध डेअरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी दूध डेअरीचे संचालक योगेश बळी, मंगेश गीद, बालाजी ठाकरे, श्रीकृष्ण चंदनशिव, विष्णू ठाकरे, गणेश जाधव, विनायक भांदुर्गे, अनिल ठाकरे, रवी कंकाळ, रूपेश दीपवार आदी दूध डेअरी संचालक उपस्थित होते.