यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:36+5:302021-02-05T09:27:36+5:30
वाशिम : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असले ...

यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ?
वाशिम : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असले तरी, सर्वसामान्य जनतेला काय मिळाले, त्यांना या अर्थसंकल्पाबाबत काय वाटते याबाबत ‘लाेकमत’तर्फे सर्वसामान्यांसह विविध व्यावसायिक, शेतकरी, गृहिणी, युवक यांच्याशी १ जानेवारी राेजी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्यात.
जाहीर करण्यात आलेल्या बजेटबाबत युवकांनी तरुणांचा राेजगाराचा प्रश्न कायमच असून नाेकऱ्या गेलेल्यांचे काय, असा प्रश्न निर्माण केला. तर काही नागरिकांनी बजेट सर्वसमावेशक असून सर्वांच्या हिताचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. तर काहींनी अर्थसंकल्प ताेंडाला पाने पुसणारे असल्याचे मत व्यक्त केले.
...........................
यंदाचा अर्थसंकल्प असाधारण असून यात विकासाचा विश्वास आहे. आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेेचे व्हीजन आणि देशातील सर्वच स्तरांतील नागरिकांचा समावेश आहे. तरुणांसाठी राेजगार निर्मितीचा विचार करण्यात आला आहे. परंतु लाॅकडाऊनमध्ये नाेकऱ्या साेडून आलेल्यांना काहीच नाही.
- चेतन जाधव, युवक, वाशिम
...........
यंदाच्या अर्थसंकल्पात किराणा व्यावसायिकांसदर्भात काेणताच ठाेस निर्णय दिसून येत नाही. अर्थसंकल्पात याबाबत ठाेस निर्णय हाेणे अपेक्षित हाेते.
नागेश काळे, किराणा दुकानदार
.................
२०२०-२१ मध्ये नागरिकांनी माेठ्या प्रमाणात आयकर भरला. अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल अपेक्षित हाेता. पण सरकारने नाेकरदार वर्गाची निराशा केली आहे. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काेणताही बदल केलेला दिसून येत नाही.
- भागवत खानझाेडे, शिक्षक
...............
यंदाच्या बजेटमध्ये सरकारकडून अनेक महत्त्वाच्या गाेष्टींवरचा आयात कर कमी करून जनतेला दिलासा दिला आहे. गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी माेठा दिलासा या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. यामुळे रिअल इस्टेटला चालना मिळणार असल्याचे दिसून येते. सेक्शन ८० इइअे सूटची मर्यादा १ वर्षापर्यंत वाढविली आहे.
- जुगलकिशाेर काेठारी, व्यापारी
................
अर्थसंकल्पामध्ये महिलांना आवड असलेले साेने, चांदीचे भाव कमी हाेणार असल्याचा आनंद आहे. परंतु घरगुती साहित्यासह खाद्यपदार्थांबाबत काेणताच निर्णय दिसून येत नाही. महिलांचा या अर्थसंकल्पात विचार करणे गरजेचे हाेते.
अश्विनी वानखडे, गृहिणी
.............
कृषी क्षेत्रासाठी वेगळा फंड तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थमंत्र्यांनी कृषी सेस आकारण्याची घाेषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन बाजारपेठेची घाेषणा केली आहे. यामुळे शेतमालाची खरेदी-विक्री प्रक्रिया मजबूत हाेईल.
- शिवाजी वाटाणे, शेतकरी
..............
काेराेनाच्या संकटात इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे माेडलेले असताना अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी अधिभार लावला. याचा फटका पेट्राेल, डिझेलला बसणार आहे.
अनिल केंदळे, पेट्राेल पंपचालक
.............
या अर्थसंकल्पात ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यांचा कर माफ करण्यात आला आहे. हा चांगला निर्णय असला तरी वयाेमर्यादा मात्र जास्त ठेवण्यात आली आहे. ही मर्यादा कमी असणे गरजेचे हाेते.
बाबाराव काळे पाटील, ज्येष्ठ नागरिक
..............
बसस्थानक परिसरात चर्चा
काेराेनामुळे अनेकांच्या नाेकऱ्या गेल्यात, हातावर पाेट असलेल्यांना गावी परतावे लागले. त्यांच्यासाठी तसेच आणि काेराेना काळात उपाशीपाेटी अनवाणी गावी परतणाऱ्या मजुरांसाठी या अर्थसंकल्पात काहीच दिसून येत नसल्याची चर्चा बसस्थानकावर दिसून आली. तर सरकार पक्षातील नागरिकांतून अर्थसंकल्प चांगला असल्याची चर्चा हाेती.
...........
शेतकऱ्यात चर्चा
काही शेतकऱ्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याचे म्हटले तर काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसल्याची चर्चा ऐकावयास मिळाली.