इंधनानुसार वाहनावर रंगीबेरंगी स्टिकर म्हणजे काय रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:38 IST2021-08-01T04:38:25+5:302021-08-01T04:38:25+5:30
आरटीओ अधिकाऱ्यांनाच जिथे याबाबत माहिती नाही तिथे सामान्य वाहन चालकांची काय अवस्था आहे. या बदलाबद्दल त्यांना काही माहिती आहे ...

इंधनानुसार वाहनावर रंगीबेरंगी स्टिकर म्हणजे काय रे भाऊ?
आरटीओ अधिकाऱ्यांनाच जिथे याबाबत माहिती नाही तिथे सामान्य वाहन चालकांची काय अवस्था आहे. या बदलाबद्दल त्यांना काही माहिती आहे का याची चाचपणी केली असता, त्यांनाही माहिती नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे केंद्राने हा बदल का केला आहे, त्याचे महत्त्व काय, त्यातून काय साध्य होणार, हे सगळे प्रश्न अनुत्तरित असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीत जरी २ लाख १७ हजार ८११ विविध इंधन वाहनांची नोंद असली तरीही केंद्राच्या निकषानुसार हिरवा, निळा, नारिंगी या बदलांबाबत मात्र जनजागृतीच नसल्याने हे बदल कधी अमलात येतील हे आताच सांगणे कठीण आहे. त्यातही पेट्रोलसाठी निळे, डिझेलसाठी नारिंगी असे स्टिकर लावण्यात येणार असल्याबाबतही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
--------------
जिल्ह्यातील एकूण वाहने - २ लाख १७,८३२
पेट्रोलवर चालणारी वाहने - २ लाख ९,७१०
डिझेलवर चालणारी वाहने - ८ हजार १०१
सीएनजी वाहने - ०००
इलेक्ट्रिक वाहने - २१
-------------------
स्टिकर कुठे मिळणार?
केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या निकषानुसार इंधनाप्रमाणे वाहनांना विशिष्ट रंगाचे स्टिकर लावावे लागणार आहे. त्यात पेट्रोल व सीएनजी वाहनांसाठी फिक्के निळे, इलेक्ट्रिक व हायब्रिड वाहनांसाठी हिरवे, तर डिझेल वाहनांसाठी नारिंगी रंगाचे स्टिकर लावण्याचे निर्देश असल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु या संकल्पनेबाबत अद्याप तरी वाशिम आरटीओ अनभिज्ञ असल्याने असे स्टिकर मिळणार तरी कोठे, या प्रश्नाचे उत्तरही मिळू शकले नाही.
-----
स्टिकर न लावल्यास
केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या निकषानुसार इंधनाप्रमाणे वाहनांना विशिष्ट रंगाचे स्टिकर लावावे लागणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी वाशिम जिल्ह्यात खुद्द आरटीओ कार्यालयच या संकल्पनेबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे वाहनधारकांनी इंधनानुसार स्टिकर लावले नाही तरी त्यांच्यावर कारवाई होण्याचा प्रश्नच येथे उद्भवत नाही.
---------------
प्रतिक्रिया : वाशिम आरटीओ हद्दीतील एकूण इंधन प्रकारानुसार वाहनांची नोंद केली आहे. मात्र, इंधनानुसार वाहनांना वेगळे स्टिकर लावण्यासंदर्भात आताच सांगता येणार नाही. कोविड काळात राज्य शासनाने पोलिसांच्या मदतीने अत्यावश्यक वाहनांसह विशेष सूट दिलेल्या रंगसंगतीच्या स्टिकरसंदर्भात माहिती होती. आता केंद्राचे निकष असतील, तर ते आमच्यापर्यंत आल्यावर त्याचीही तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल.
-ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम