जिल्हा रुग्णालयात बुधवारी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST2021-01-13T05:45:38+5:302021-01-13T05:45:38+5:30
महावितरणकडून केबल जप्तीची कारवाई वाशिम : शेतांमधील कृषिपंपांना लागणाऱ्या वीजवाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी केली जात आहे. याप्रकरणी महावितरणने धडक ...

जिल्हा रुग्णालयात बुधवारी शिबिर
महावितरणकडून केबल जप्तीची कारवाई
वाशिम : शेतांमधील कृषिपंपांना लागणाऱ्या वीजवाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी केली जात आहे. याप्रकरणी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली असून, केबल जप्तीची कारवाई केली जात असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी दिली.
‘वॉकिंग ट्रॅक’वर स्वच्छतेचा अभाव
वाशिम : शहरातील जुन्या आययूडीपी कॉलनी परिसरात असलेल्या ‘वॉकिंग ट्रॅक’ सभोवताली कचरा साचलेला आहे. यासह मधोमध झाडेझुडपे उगवली असून, रात्रीच्या सुमारास काही महाभाग इथे मद्यप्राशन करतात. याकडे नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी धनंजय गायकवाड यांनी केली आहे.
.................
सिंचन तलावाला ‘सेल्फी’प्रेमींची भेट
भर जहाँगीर : नजीकच असलेल्या मोरगव्हाण सिंचन तलावानजीक तयार झालेल्या वळण रस्त्यामुळे तलावाला मनोहारी स्वरूप प्राप्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी कठडेही उभारण्यात आले असून, परिसरातील सेल्फीप्रेमी भेट देऊन छायाचित्र काढत असल्याचे दिसून येत आहे.
.................
पूर संरक्षण भिंतीचे काम प्रगतीवर
मानोरा : धामणी येथून वाहणाऱ्या अरुणावती नदीपात्राला लागून असलेल्या गावांमध्ये पूर येऊ नये, यासाठी पूर संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. हे काम सध्या प्रगतिपथावर असल्याचे पाहावयास मिळत आहे.
..................
चारा पिकांची लागवड नगण्य
अनसिंग : दुधाळ जनावरांना वयाच्या २.५ ते ३ टक्के चारा दररोज लागतो. ही गरज भागविण्यासाठी ज्वारी, बाजरी, संकरित नेपीयन गवत, मका, चवळी, जयवंत, ल्युसर्न आदी प्रकारच्या हिरव्या चारा पिकांची लागवड करणे आवश्यक आहे; मात्र परिसरात चारा पिकांची लागवड नगण्य स्वरूपात केली जात आहे.
इंटरनेट जोडणीची कामे प्रलंबित
तोंडगाव : भारत नेट प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यात परिसरातील काही ग्रामपंचायतींना इंटरनेटची जोडणी मिळणार आहे; मात्र हे काम प्रलंबित असून, ते गतीने पूर्ण करावे, अशी मागणी प्रवीण गोटे यांनी प्रशासनाकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.
.............
कापूस उत्पादक खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत
मानोरा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादित केला जातो. त्यामुळे येथे सीसीआयचे आधारभूत कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, यासाठी नोंदणीकृत १०१७ शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केली; मात्र ती अद्याप पूर्ण झाली नसून प्रतीक्षा कायम आहे.
...
जैववैद्यकीय कचरा उघड्यावर
मंगरूळपीर : जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत शहरात सुविधा उपलब्ध झालेली नाही. यामुळे खासगी दवाखान्यांसोबतच शासकीय स्तरावरील रुग्णालयांमधून बाहेर पडणारा जैववैद्यकीय कचरा उघड्यावरच टाकला जात असल्याचे दिसून येत आहे.
..........
पोकरा प्रकल्पांतर्गत सूक्ष्म आराखडा
मालेगाव : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) तालुक्यातील गावांमध्ये सिंचन, शेतोपयोगी अवजारे, पाण्याचा वापर आदींबाबतचे नियोजन करण्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार करण्यात येत आहे.
......................
बालविवाहांबाबत कळविण्याचे आवाहन
शेलुबाजार : परिसरात कुठेही बालविवाह होत असल्यास चाइल्ड लाइनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी कळवावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी शुक्रवारी येथे एका कार्यक्रमात केले.
...................
सेंद्रिय शेतमाल खरेदीस प्रतिसाद
वाशिम : जिल्ह्यातील ११७५ शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या सेंद्रिय शेतीची कास धरली असून, १८ शेतकरी गटांकडून उत्पादित सेंद्रिय शेतमालाची विक्री ‘आत्मा’ कार्यालयानजीक केली जात आहे. त्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे.
.....................
मुक्या जनावरांची कोंबून वाहतूक
वाशिम : दर रविवारी वाशिम येथे गुरे खरेदी-विक्रीचा बाजार भरतो. व्यवहार होण्यापूर्वी व झाल्यानंतर जनावरे वाहनांमध्ये अक्षरश: कोंबली जातात. असाच गंभीर प्रकार आजही दिसून आला. याकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे.
...................
कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी
केनवड : रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांवर सध्या विविध किडींनी हल्लाबोल केला आहे. त्यावर नियंत्रणासाठी रासायनिक औषध फवारणे आवश्यक ठरत असून, खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होत आहे.