आम्ही लस घेतली; तुम्ही पण घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:36 IST2021-01-21T04:36:15+5:302021-01-21T04:36:15+5:30
जिल्ह्यात वाशिम, मंगरूळपीर व कारंजा अशा तीन ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. लसीकरणानंतर परजिल्ह्यात काही ठिकाणी लाभार्थिंना ...

आम्ही लस घेतली; तुम्ही पण घ्या!
जिल्ह्यात वाशिम, मंगरूळपीर व कारंजा अशा तीन ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. लसीकरणानंतर परजिल्ह्यात काही ठिकाणी लाभार्थिंना ताप, डोकेदुखी आदी सौम्य लक्षणे आढळून येत असल्याने फ्रंटलाईन वर्कर्समध्ये थोडीफार धाकधूकही आहे. जिल्ह्यात मधुमेह, रक्तदाब असलेल्या काही फ्रंटलाईन वर्कर्स यांनीदेखील कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून, लस घेतल्यानंतर कोणताही त्रास जाणवला नाही, अशा प्रतिक्रिया लस घेतलेल्या आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. ‘आम्ही लस घेतली, तुम्ही पण लस घ्या’, असे आवाहनही कोरोना योद्ध्यांनी फ्रंट लाईन वर्कर्स यांना केले.
०००
गत आठ-नऊ महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वाॅर्डमध्ये काम करीत आहे. कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर लस घेण्यासाठी उत्सुक होतो. मंगळवारी लस टोचून घेतली. लसीकरणानंतर कोणताही त्रास जाणवला नाही. मनात कोणतीही भीती न बाळगता इतरांनीदेखील लस घ्यावी.
- डॉ. विश्वनाथ बगाटे
क्ष-किरण तज्ज्ञ,
जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम
००००
रुग्णालयात विविध आजारांच्या रुग्णांवर उपचार करताना, यामध्ये एखादा कोरोना संसर्ग झालेला रुग्ण आला तर त्यापासून आपल्यालाही संसर्ग होवू शकतो, अशी भीती मनात राहत असे. आता कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. या लसीकरणामुळे कोणताही त्रास झाला नाही. इतर आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांनीदेखील लस घ्यावी.
- प्रज्ञा अशोक भगत,
परिचारिका, ग्रामीण रुग्णालय अनसिंग
०००००
कोरोना प्रतिबंधक लस टोचल्यानंतर ३० मिनिटे निरीक्षण कक्षात निगराणीखाली ठेवले. मला कोणताही त्रास जाणवला नाही. आता एक महिन्याने लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी शरीरात कोरोना विरुद्धच्या ‘अँटिबॉडीज’ तयार होतील. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव होण्यास मदत होईल. इतरांनीदेखील ही लस घ्यावी.
- सुनील टोलमारे, आरोग्यसेवक,
प्रा.आ. केंद्र काटा
00000
कोरोना प्रतिबंधक लसी केव्हा येणार? याची उत्सुकता होती. आता ही लस प्राप्त झाली असून, मोबाईलवर संदेश मिळाल्यानंतर मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे लस घेतली. लसीकरणानंतर कोणताही त्रास जाणवला नाही. लस सुरक्षित असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फ्रंटलाईन वर्कर्स यांनी लस घ्यावी.
- पुंडलिक देवढे, आरोग्यसेवक
प्रा.आ. केंद्र काटा