वाशिम : राज्यात नोव्हेल कोरोना (कोव्हीड-१९) विषाणुच्या पृष्ठभूमिवर पाण्याचे टँकर्स मंजुरातीचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. याबाबत महसूल व वनविभागाचे उपसचिव यांनी २२ एप्रिल रोजी अध्यादेश काढून राज्यातील सर्व संबधितांना पाठविले आहेत.कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर स्थलांतरीत मजूर व नागरिकांकरिता निर्माण केलेल्या शिबिरांकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेकडून पुरेसा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकत नसल्यास, टँकरव्दारे पिण्याच्या साधरण वापराकरिता पाणी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तसेच टंचाई परिस्थिती विचारात घेता पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजुर करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन कोरोना साथीच्या नियंत्रणात्मक कामकाजात व्यस्त असल्याने टँकर मंजुरीचे जिल्हाधिकारी यांचेकडे असलेले अधिकार संबधित उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.टंचाईग्रस्त गावांना झाले सोयीचे!कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर संपूर्ण जिल्हा प्रशासन नियंत्रणात्मक कामकाजात व्यस्त असल्याने गावातील पाणी टंचाई निवारणार्थ, टँकर सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी कसा संपर्क करावा या विवंचनेत संबधित असतांनाच २२ एप्रिल रोजी महसूल व वनविभागाच्या या आदेशामुळे टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पाणी टँकर मंजुरीचे अधिकार आता उपविभागीय अधिकाऱ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:51 IST