रिसोड तालुक्यातील २० गावांना पाणीटंचाईच्या झळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:41 IST2021-05-26T04:41:03+5:302021-05-26T04:41:03+5:30
रिसोड : रिसोड तालुक्यातील २० गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, तीन ठिकाणी बोअर व विहीर अधिग्रहण करण्यात आले ...

रिसोड तालुक्यातील २० गावांना पाणीटंचाईच्या झळा !
रिसोड : रिसोड तालुक्यातील २० गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, तीन ठिकाणी बोअर व विहीर अधिग्रहण करण्यात आले तर करंजी गरड येथे टँकर सुरु करण्यात आले आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीला रिसोड तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तालुक्यातील करंजी गरड या गावाला दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदादेखील करंजी गरड येथे पाणीटंचाई असल्याने टँकर सुरू करण्यात आले आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तसेच परतीच्या पावसामुळे प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा होता. जलपातळीतही फारशी घट नाही. त्यामुळे यावर्षी अनेक गावात पाणीटंचाईची तीव्रता देखील कमी असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी ३४ पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली होती. जवळपास ४ ठिकाणी विहिरी व बोअर अधिग्रहण केले होते तर एका ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तालुक्यातील सात ग्रामपंचायतीचा १० विहिरी व एक बोअर अधिग्रहणासाठीचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला आहे. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुक्यातील धोडप बु , लोणी बु, वडजी, पेनबोरी, देगाव, भोकरखेडा, वाडीरायताळ, गोवर्धन, सवड, येवती, मसलापेन, मांगुळ झनक, लोणी खु, आसोला, व्याड, शेलगाव राजगुरे, चाकोली, कवठा, गणेशपूर, पांचाबा या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. याशिवाय काही गावांतील महिलांना शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा मंजूर आहे. परंतु, त्या तुलनेत प्रभावी अंमलबजावणी नसल्याचे दिसून येते. नळयोजना दुरुस्तीमध्ये
व्याड, शेलगाव, चाकोली, कवठा, गणेशपूर, पाचांबा ही गावे आहेत.
यावर्षी तहसील कार्यालयात पाच तर पंचायत समिती कार्यालयात सात असे एकूण १२ गावातून विहीर व बोअर अधिग्रहणाकरिता प्रस्ताव आले आहेत.
तसेच गत वर्षी १३ मेपर्यंत करंजी गरड येथे टँकर सुरू होते. तर ३ विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले होते.
०००
कोट बॉक्स
रिसोड तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फारच कमी प्रमाणात पाणीटंचाई आहे. काही गावातील विहीर व बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर लवकरच तोडगा काढू तसेच करंजी गरड या गावात नियमित टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
संतोष आष्टीकर
गटविकास अधिकारी, पं. स. रिसोड