जलवाहिनीला गळती; मंगरूळपीरला कमी दाबाने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST2021-04-28T04:44:38+5:302021-04-28T04:44:38+5:30
मंगरूळपीर शहराला मोतसावंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. मोतसावंगा पाणीपुरवठा योजना हे पाण्याचे मुख्य स्रोत असून सायखेडा ते माणोली, माणोली रोडवर, ...

जलवाहिनीला गळती; मंगरूळपीरला कमी दाबाने पाणीपुरवठा
मंगरूळपीर शहराला मोतसावंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. मोतसावंगा पाणीपुरवठा योजना हे पाण्याचे मुख्य स्रोत असून सायखेडा ते माणोली, माणोली रोडवर, चिंचाळा फाट्यानजीक व सोनखासजवळ अशा चार ठिकाणी भूमिगत जलवाहिनीला लिकेज (गळती) झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. जलवाहिनीला लागलेली गळती दूर करण्याचे काम सुरू आहे. गळती वाढत असून त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. सोमवारी (दि. २६) सकाळी नऊ वाजता आवश्यक त्या मशीनसह कर्मचारी दुरुस्तीचे काम करीत होते. या गळतीमुळे पाणीपुरवठ्याचा दाब कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून गळती काढल्यानंतर लगेच तिथे वेल्डिंग केले जाईल. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले तर पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे नियोजन आहे. काही विघ्नसंतोषी लोकांनी ही पाईपलाईन फोडून लिकेज केल्यामुळे हा त्रास शहरातील नागरिकांना होत आहे. सध्या मुख्याधिकारी खंडारे, अभियंता शेवदा, कंत्राटदार एस एम भोर, धनंजय खंडेतोड हे मजुरांसह लिकेजच्या ठिकाणी तळ ठोकून बसले आहेत. एक-दोन दिवस पाणीपुरवठासंदर्भात गोंधळ होणार असल्याने नागरिकांनी पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.