तापाची साथ; रुग्णालय हाऊसफुल्ल !
By Admin | Updated: September 19, 2014 01:26 IST2014-09-19T01:26:21+5:302014-09-19T01:26:21+5:30
अनसिंगच्या रुग्णालयात रुग्णांचे बेहाल : जिल्हा शल्यचिकित्सकाचे दुर्लक्ष.

तापाची साथ; रुग्णालय हाऊसफुल्ल !
अनसिंग : गेल्या पंधरा दिवसांपासून अनसिंग परिसरात तापाची लाट पसरली असून, लहान बालके, वृद्ध, महिला यांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामीण रुग्णालय तुडुंब भरले असून, ग्रामीण रुग्णालयात चार डॉक्टर ऐवजी एकच डॉक्टर कार्यरत असल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असून, याकडे मात्र जिल्हा शल्यचिकित्सकाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
अनसिंग परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे परिसरातील खेड्यापाड्यांमध्ये तापाची साथ पसरली असून, जवळपास घरोघरी कुणीतरी लहान बालक, बालिका, वृद्धा तापाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात एकदम गर्दी वाढली आहे; परंतु येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून या ठिकाणी चार डॉक्टरऐवजी एकच डॉक्टर कार्यरत आहे. या ठिकाणी असलेले डॉ. आशीष मारकड एकच असून, ते त्यांच्या परिने सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु दररोज जवळपास २00 ओपीडी होत असून, एवढय़ा रुग्णांना एकाच डॉक्टरने तपासणे शक्य होत नसल्यामुळे दवाखान्यात तपासणीसाठी ओपीडीसाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ येथील रुग्णांवर आलेली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाकडे जिल्हा शल्यचिकित्सकांचे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ मारकड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ओपीडी वाढली असल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांना डॉक्टरची संख्या वाढविण्यासाठी अनेकवेळा लेखी, तोंडी कळविले. पण अद्याप एकही डॉक्टर दिला नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय वाढत असल्याचे सांगीतले.