‘जलयुक्त शिवार’द्वारे पाणी टंचाईवर मात शक्य!
By Admin | Updated: March 9, 2016 02:11 IST2016-03-09T02:05:59+5:302016-03-09T02:11:11+5:30
जलजागृती सप्ताहांतर्गत कार्यक्रमात राजेंद्र सिंह यांचे प्रतिपादन.

‘जलयुक्त शिवार’द्वारे पाणी टंचाईवर मात शक्य!
वाशिम : महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षीपासून सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाद्वारे पाणीटंचाईवर मात करणे शक्य असल्याचे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. जलयुक्त शिवार अभियान समिती व 'आत्मा' वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने वाटणे लॉन्स येथे ८ मार्च रोजी आयोजित जलजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यातील शेतकरी, ग्रामस्तरीय पदाधिकारी व कर्मचारी यांना जलयुक्त शिवार अभियानाविषयी मार्गदर्शन व्हावे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, विदर्भात राजस्थानपेक्षा चौपट पाऊस पडतो; मात्र या ठिकाणी उष्णता अधिक असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. त्यामुळे येथील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पावसाचे पडणारे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीत जिरवणे हाच विदर्भातील दुष्काळावरील उपाय आहे. गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे त्यांनी सांगितले. जमिनीवरील हिरवळ कमी होत असल्याने जमिनीची उष्णता वाढली आहे, त्यामुळे ऋतुचक्र बदलले असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे, तसेच अवेळी पाऊस पडत आहे. जमिनीवरील हिरवळीचे प्रमाण वाढवून जमिनीची उष्णता कमी केल्याशिवाय ऋतुचक्र संतुलित राहणार नाही, असे डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी राजस्थानमधील अल्वर जिल्ह्यातील कामांचे उदाहरण देऊन ऋतुचक्र संतुलित कसे करता येईल, हे सांगितले. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे जमिनीची धूप व उष्णता कमी होण्यास मदत होईल. तसेच ऋतुचक्र संतुलित होऊन पावसाचे प्रमाण पूर्ववत होईल. शेतकर्यांनी जलयुक्त शिवार अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड होत्या. यावेळी आमदार अमित झनक, वाशिमच्या नगराध्यक्ष लता उलेमाले, सभापती ज्योती गणेशपुरे, जि.प. सदस्य गजानन अमदाबादकर, विकास गवळी, उस्मान गारवे यांच्यासह विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, विभागीय कृषी सहसंचालक शुद्धोधन सरदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, लघू पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कोहीरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक अरुण वाघमारे आदी उपस्थित होते.