मालेगाव तालुक्यातील सुदी येथे लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने गेल्या अकरा वर्षापूर्वी संग्राहक तलावाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून आजवर या तलाव भिंतीची कोणत्याच प्रकारची डागडुजी झाली नसल्याने भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढले. काही ठिकाणी भिंतीला तडे सुद्धा गेले. परिसरातून गेलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात खोदकाम करून या तलाव क्षेत्रातून मुरुमाची उचल करण्यात आली. त्यामुळे तलावाचे पाणी साठवण क्षमतेत पूर्वीपेक्षा विस २५ टक्के वाढ झाली आहे. साठवण क्षमतेत वाढ झाल्याने संपादित क्षेत्राबाहेरील अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत तलावाचे पाणी घुसून पिकांची नासधूस झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. गत महिनाभरापासून तलावाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गत आठवडा भरापासून परिसरात पाऊस सुरू असल्याने तलाव भिंतीच्या मध्यभागी काही ठिकाणावरून पाण्याचे पाट वाहत असल्याची बाब चार ते पांच दिवसांपूर्वी एका गुराख्याच्या निदर्शनास आली. याबाबतची माहिती नजीकच्या शेतकऱ्यांना मिळताच अनेक शेतकऱ्यांनी तलाव भिंतीवर धाव घेऊन पाहणी केली व तत्काळ संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना केली. मात्र तलाव भिंतीतून वाहणाऱ्या पाण्याचा अद्यापही बंदोबस्त करण्यात आला नाही.
०००००
सुदी संग्राहक तलावाच्या निर्मितीपासून डागडुजी झाली नाही. त्यामुळे भिंतीवर मोठ मोठे वृक्ष वाढलेले आहेत. भिंतीला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. गत काही दिवसांपासून भिंतीच्या मध्यभागातून काही ठिकाणी पाण्याचे लोट वाहत आहेत. संबंधितांना याबाबत सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
रमेश चव्हाण
शेतकरी, सुदी