सुदी संग्राहक तलावाच्या भिंतीतून वाहू लागले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST2021-09-26T04:44:36+5:302021-09-26T04:44:36+5:30

मालेगाव तालुक्यातील सुदी येथे लघुपाटबंधारे विभागाच्यावतीने गेल्या ११ वर्षांपूर्वी संग्राहक तलावाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून आजवर या ...

Water began to flow through the wall of the sudi collector pond | सुदी संग्राहक तलावाच्या भिंतीतून वाहू लागले पाणी

सुदी संग्राहक तलावाच्या भिंतीतून वाहू लागले पाणी

मालेगाव तालुक्यातील सुदी येथे लघुपाटबंधारे विभागाच्यावतीने गेल्या ११ वर्षांपूर्वी संग्राहक तलावाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून आजवर या तलाव भिंतीची कोणत्याच प्रकारची डागडुजी झाली नसल्याने भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेले आहेत, तर काही ठिकाणी भिंतीवर तडेसुद्धा गेलेले दिसत आहेत. परिसरातून गेलेल्या समृद्धी महामार्ग निर्मितीच्या कामासाठी लागणाऱ्या गौण खनिजाची गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात या तलाव क्षेत्रातून उचल करण्यात आल्याने तलावाच्या पाणी साठवण क्षमतेत पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने संपादित क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिकांची नासधूस झाली आहे. यावर्षी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ऑगस्ट महिन्यातच हा तलाव पूर्णपणे भरला होता, त्यामुळे गत महिनाभरापासून तलावाच्या सांडव्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. गत आठवडाभरापासून परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने तलावात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. त्यातच तलाव भिंतीच्या मध्यभागी पडलेल्या छिद्रातून काही ठिकाणावरून पाण्याचे पाट वाहत असल्याची बाब चार ते पाच दिवसांपूर्वी एका गुराख्याच्या निदर्शनास आली. याबाबतची माहिती नजीकच्या शेतकऱ्यांना मिळताच अनेक शेतकऱ्यांनी तलाव भिंतीवर धाव घेऊन पाहणी केली व तत्काळ संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना त्या बाबत सूचना केली. मात्र तलाव भिंतीतून वाहणाऱ्या पाण्याचा अद्यापही बंदोबस्त न केल्याने शेतकरी वर्ग कमालीचा धास्तावलेला दिसत आहे. पाटबंधारे विभागाप्रती शेतकऱ्यांमधून कमालीचा रोष व्यक्त केला जात आहे.

सुदी संग्राहक तलावाच्या निर्मितीपासून डागडुजी झाली नाही, त्यामुळे भिंतीवर मोठ मोठे वृक्ष वाढलेले आहेत. भिंतीला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. गत काही दिवसांपासून भिंतीच्या मध्यभागातून काही ठिकाणी पाण्याचे लोट वाहत आहेत. संबंधितांना याबाबत सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

रमेश चव्हाण

शेतकरी सुदी

Web Title: Water began to flow through the wall of the sudi collector pond