साखरावासींचा पाण्याचा ताळेबंद
By Admin | Updated: June 28, 2014 01:42 IST2014-06-28T00:54:35+5:302014-06-28T01:42:00+5:30
साखरावासीं पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या ताळेबंदानुसार करणार पिकांचे नियोजन.

साखरावासींचा पाण्याचा ताळेबंद
वाशिम : आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कार्यक्रमांतर्गत ग्राम साखरा येथे कृषी मित्र बहुउद्देशीय संस्था बोराळाच्यावतीने पाण्याचा ताळेबंद जाहीर करण्यात आला आहे. या गावाचे शेतकरी पाण्याच्या ताळेबंदानुसार पिकांचे नियोजन करणार आहेत.
या गावाचा उपलब्ध पाणी साठा ८८.५७ कोटी लिटर आहे; परंतु अनाठायी वापरामुळे ३८.४७ कोटी लिटर पाण्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे या गावाला दरवर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी पाणी अडवा आणि पाणी जिरवा, मोहीम राबविणे व पिकांचे व्यवस्थित नियोजन करण्याचा उपाय योग्य असल्याचे कृषी मित्र संस्थेने ताळेबंदावरुन सुचविले आहे. त्यामुळे साखरा गावचे शेतकरी यंदा पाण्याच्या ताळेबंदानुसार पिकांचे नियोजन करीत आहेत.
कृषी मित्र संस्थेचे अध्यक्ष आर.आर.वानखेडे व सचिव नारायण महाले यांनी साखरा गावाचा पाण्याच्या ताळेबंद घोषित केला आहे. त्यानुसार साखरा गावाचे भौगोलिक क्षेत्र ७२१.६४ हेक्टर असून, गावठाणचे क्षेत्र १.२0 हेक्टर आहे.
गावातील लोकसंख्या १00३ आहे. जनावरांची संख्या ३३४ व सरासरी पर्जन्यमान ७५0 मि.मि. आहे. गावठाणात पडणारा पाऊस १ कोटी लिटर आहे तर गावशिवारात ३९२.१३ कोटी लिटर पाणी पडते. लघुसिंचन तलावपाझर तलाव, नाला, सिमेंट बंधारे आदी स्त्रोतांद्वारे भूजलात रुपांतरीत होणारा साठा १.९८ कोटी लिटर आहे. गावाच्या लोकांच्या पिण्यासाठी व वापरण्यासाठी १.८३ कोटी लिटर वापरले जाते. जनावरांसाठी २.११ कोटी लिटर पाणी वापरले जाते. शेती वर्गवारीनुसार शेतीसाठी ११.८१ कोटी तर २२ कोटी लिटर पाणी बिगर शेती कामांसाठी वापरले जाते.
पाणी ३५ टक्के १0६.६६ कोटी लिटर अर्थात ३५ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते तर जमिनीवर शेवटपर्यंत साठून राहणारे पाणी पाच टक्के अर्थात २९.५२ कोटी लिटर आहे.
गावातील नळपाणी पुरवठा, विहिरी, हातपंप, विद्युत पंप, सार्वजनिक विहिरी अशा स्त्रोतांपासून १.९७ कोटी लिटर पाणी उपलब्ध होते. अशा प्रकारे एकूण ८८.४७ कोटी लिटर पाणी उपलब्ध होत असताना त्याचा अनाठायी वापर केला जात असल्याने ३८.४७ कोटी लिटर पाण्याचा तुटवडा निर्माण होतो.
त्यामुळे गावाची पाणीटंचाई दूर करण्यासाठी यावर्षी पावसाळय़ात कमी पाण्यावर वाढणारी पिके घेऊन तुषार व सूक्ष्म सिंचनाचा वापर करुन व विहिरींचे पुनर्भरण करण्याचा निर्धार साखराच्या ग्रामस्थांनी व शेतकर्यांनी केला आहे.